29.7 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home गुन्हेवार्ता एटापल्ली पं.स.च्या पेट्रोल-डिझेल पंपावर दीड कोटीची अफरातफर?

एटापल्ली पं.स.च्या पेट्रोल-डिझेल पंपावर दीड कोटीची अफरातफर?

0
5

एटापल्ली : येथील पंचायत समितीद्वारा चालविल्या जाणाऱ्या विकास सर्व्हिस स्टेशन नामक पेट्रोल पंपच्या पेट्रोल व डिझल विक्रीतून कमवलेल्या दीड ते दोन कोटी रुपये नफ्याच्या रकमेत झालेला कथित घोटाळा थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीची दखल आमदार अभिजित वंजारी यांनी घेतली असून हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यावर प्रशासनाने काय कारवाई केली याचे उत्तर 2 जुलैला विधिमंडळात मिळणार आहे.

22 वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या धोरणावरून मागास, अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावीत तालुका म्हणून एटापल्ली येथे पंचायत समितीमार्फत भारत पेट्रोलियम या कंपनीचे “विकास सर्व्हिस सेंटर” नामक पेट्रोल पंप सुरु करण्यात आले. सदर पेट्रोल पंपाच्या माध्यमातून पंचायत समितीला दरमहा लाखो रुपये नफ्याची कमाई होत आहे, मात्र पेट्रोल व डिझेल विक्रीचे आर्थिक व्यवहाराचे कोणतेही रेकॉर्ड या कार्यालयात तयार केले जात नाही. त्यामुळे पेट्रोल व डिझेल विक्रीची नफा रक्कम पेट्रोल पंपचे व्यवस्थापक, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व संबंधित पेट्रोल पंपाचा प्रभार सांभाळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हडप केली जात आहे, अशा आरोपाचे निवेदन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम, निलेश गंपावार, नरोत्तम अधिकारी, अरुण डे, श्रीनिवास कम्बोगौनीवार, दिलीप पुपरेड्डीवार, शुभम वन्नमवार, पंकज पत्तीवार व इतर काही नागरिकांनी आमदार अभिजित वंजारी यांना दिले होते.

पेट्रोल पंप चालविताना पंचायत समिती प्रशासनाने पेट्रोल पंपाचे आर्थिक व्यवहार व व्यवस्थापन सांभाळण्यासाठी एक लाख रुपयापेक्षा जास्त मासिक पगार असलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली, मात्र हे अधिकारी हे मूळ आस्थापनेच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून संपूर्ण कार्यालयीन वेळेत पेट्रोलपंप व्यवस्थापन सांभाळण्याच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्या अधिकाऱ्याकडील शासनाच्या मूळ आस्थापना कामात खोळंबा होऊन नागरिकांची कोणतीही प्रशासकीय कामे होत नाहीत व शासकीय लाभाच्या विविध योजना मिळविण्यासाठी आदिवासी, गोरगरीब नागरिकांना अडचण निर्माण होत आहे, असा आरोप निवेदनात केला होता.

पेट्रोल व डिझेल विक्रीतून मिळणारी लाखो रुपयांची कमाई लाटण्याचा उद्देशानेच सदर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मूळ आस्थापनेची कामे सोडून दिवसभर पेट्रोलपंप चालकाचे कामे करतात, असाही आरोप निवेदनात केला होता. त्या नफ्यातून मिळालेल्या रकमेची विल्हेवाट केवळ कागदावर विकास कामे दाखवून प्रत्यक्षात घोळ केल्याचा संशय निवेदनातून व्यक्त केला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी आ.वंजारी यांनी त्यावर पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली आहे.याप्रकरणी गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांना विचारले असता, पेट्रोल पंप नफा रकमेच्या कथित घोटाळ्याची चौकशी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून केली जात असल्याचे सांगितले.