गुप्तधन शोधणारी टोळी गजाआड

0
15

साकोली,दि.17 :तालुक्यातील सासरा येथील सराळ तलावालगतच्या शेतातील एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून १५ फेब्रुवारीच्या रात्री खोदकाम करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीत १२ ते १५ लोकांचा समावेश असावा असा अंदाज आहे. गुप्तधनाच्या शोधात खोदकाम करणाऱ्या टोळीतील सासरा येथील दोन व्यक्तीसह अन्य सहाजण असे आठ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
१५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता सासरा येथील एक शेतकरी विद्युतपंप सुरू करण्याकरिता गेला असता सासरा-मिरेगाव मार्गावरील चिंचेच्या झाडाजवळ दुचाकी ठेऊन काही लोक खोदकामाची अवजारे घेऊन सराळ तलावाच्या दिशेने जात असल्याचे त्या शेतकऱ्याने पाहिले. त्यानंतर ही माहिती गावात सांगताच हा गुप्तधन शोधण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही तरूणांनी या प्रकाराची माहिती घेतली असता १२ ते १५ लोकांची टोळी शेतातील दगडाच्या सभोवताल खोदकाम करीत होते. यावेळी काही मांत्रिक विधी करीत असल्याचे दिसताच हा गुप्तधन शोधण्याचा प्रकार असल्याची खात्री पटली. त्यानंतर काही लोक त्यांच्या पाळतीवर राहिले तर काहींनी साकोली पोलीस ठाण्यात माहिती दिली.
अवघ्या काही वेळेतच साकोली पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. सापळा रचून या टोळीतील आठ जणांना पकडण्यात आले. त्यातील काहीजण पसार झाले. सकाळी काही मंडळी घटनास्थळाकडे जात असताना त्या टोळीतील एक व्यक्ती तणसीच्या ढिगात लपून असलेला आढळून आला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीत ब्रम्हपुरी, कुर्झा, भंडारा, रेंगेपार, सावरबंद, कुंभली, सासरा येथील लोकांचा समावेश असावा असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. तपास साकोली पोलीस करीत आहेत.