22.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home गुन्हेवार्ता पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या

पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या

0
29

नागपूर,दि.19ः-भीशीच्या पैशावरून एका पत्रकाराच्या आई व दीड वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करून दोघांचेही मृतदेह जवळच असलेल्या नाल्यात फेकण्याची थरारक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. उषा सेवकदास कांबळे (५४) व राशी रविकांत कांबळे (१८ महिने) मृतांची नावे असून ते दोघेही ‘नागपूर टुडे’ या संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि मुलगी आहे. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी अपहरण आणि खूनाचा गुन्हा नोंदवून आरोपी गणेश रामबरण शाहू (२६) रा. पवनपुत्र नगर हुडकेश्‍वर याला अटक केली आहे. भीशीच्या पैशावरून उषा व चिमूकली राशी यांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती सुत्रानी दिली आहे.
उषा या नातीला घेऊन ज्वेलरीच्या दुकानात जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान जवळच असलेल्या टेलरकडून कपडे घेतले आणि परिसरातील शिव किराणा दुकानात गेल्या. त्यानंतर त्या घरी पसतल्याच नाही. उषा आणि राशी शनिवारी सायंकाळी ५.३0 पासूनच बेपत्ता होत्या. त्यामुळे रविकांतच्या वडिलांनी उषाला फोन केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रविकांतची पत्नी घरी आली. या प्रकरणाची रविकांतला माहिती दिली. तो रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घरी आला. त्यानेही शोध घेतला. मात्र, आई व मुलीचा कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे हुडकेश्‍वर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसही शोध घेतच होते. दरम्यान रविवारी सकाळी बहादुरा परिसरातील एक व्यक्ती सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास ब्रश करीत असताना त्याला जवळच असलेल्या नाल्यात दोन पोत्यात काहीतरी आढळले. त्याने जवळ जाऊन बघितले असता ते मृतदेह होते. त्याने लगेच जवळच्या पोलिस चौकीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यास सांगितले. पोलिसाने हुडकेश्‍वर ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. संशयित आरोपी रामबरण शाहूला ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी केली.