उधारीच्या वादात युवकाचा खून

0
11

भंडारा ,दि.०८ःकिराणा दुकानातून बिस्कीटचे पाकीट उधारी मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दुकानमालकासह तिघांनी एका युवकाला लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले. त्यात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहरातील मेंढा येथे घडली.
प्रकाश जयराम धुर्वे (४३) रा. मेंढा असे मृताचे नाव असून राम उर्फ बब्बू मुरलीधर संतवाणी, संजू संतवाणी, मुरलीधर भागचंद्र संतवाणी रा. मेंढा अशी आरोपींची नाव आहेत. पोलिसांनी राम व मुरलीधर यांना अटक केली असून संजू फरार आहे.
यातील मृतक प्रकाश याच्या घराजवळ संतवानी याचे किराणा दुकान आहे. गुरुवारी सकाळी प्रकाश हा बिस्कीट घेण्यासाठी संतवाणी याच्या किराणा दुकानात गेला. परंतु, त्याच्याकडे पैसे नसल्याने उधारी देण्यास राम संतवाणीने नकार दिला. त्यातून वाद निर्माण झाल्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत राम संतवाणीने प्रकाशला जोरात धक्का मारल्याने तो भिंतीवर जाऊन आदळला व खाली कोसळला. तेवढय़ात संजू व मुरलीधर हे दोघेही धावत आले व तिघांनी मिळून प्रकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मुरलीधर व राम यांनी पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी मुरलीधर संतवाणी, राम संतवाणी, संजू संतवाणी यांच्यावर भादंविच्या कलम ३0२, ३४ सहकलम ३ (२) ५) अनु.जाती, जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुरलीधर संतवाणी व राम संतवाणी यांना अटक केली असून संजू हा फरार आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड करीत आहेत.