ड्रगमाफियाशी संबध सहा पोलिस कर्मचारी निलंबित

0
13

नागपूर,दि.06ः-ड्रग माफिया आबू ऊर्फ फिरोजखान याच्या सतत संपर्कात असलेल्या सहा पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी रात्री निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस दलातील सुमारे ३५ अधिकारी आणि शिपाई आबूच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले आहे.पहिल्या टप्यात फौजदार साजीद मोवाल आणि शरद शिंपणे (तहसील), नीलेश पुरवे (हुडकेश्‍वर), मनोज ओरके (सक्करदरा डीबी प्रमुख), शिपाई जयंत शेलोट आणि श्याम मिश्रा अशी निलंबित अधिकारी आणि शिपायांची नावे आहेत.
उपराजधानीत मोठय़ा प्रमाणात एमडी या मादक पदार्थांची तस्करी होत असल्याने पोलिसांना नव्यानेच माहिती मिळाली होती. मात्र, काही ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिस त्रस्त झाले होते. दरम्यान, पोलिस तपासात असतानाच काही दिवसांपूर्वी गणेशपेठ हद्दीत दोघांना पकडण्यात आले होते. दोघांनीही दिलेल्या माहितीवरून ते आबूसाठी एमडीची तस्करी करीत होते, अशी कबुली त्यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी पाठलाग करून आबूला पकडले होते.
पोलिसांनी आबूच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता पोलिस दलातील सुमारे ३५ अधिकारी आणि शिपाई आबूच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. हे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने आबूच्या संपर्कात होते. जयंत शेलोट या शिपायाने दोन महिन्यात २ हजार ४00 वेळा तर फौजदार मनोज ओरके यांनी २८ वेळा मोबाईलवरून आबूशी संपर्क साधल्याची माहिती आहे.