महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0
17

वाशिम,दि.0६ःः-येथील भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचार्‍याने मालमत्ता नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. वाशीम उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील किरण माधवराव काकडे असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला कर्मचार्‍याचे नाव आहे. शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, आजोबांच्या नावे असलेली मालमत्ता तक्रारदाराचे वडील व काकाचे नावे उतरविण्यासाठी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक किरण काकडे यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार १६ ऑक्टोबर २0१८ रोजी अकोला एसीबीकडे करण्यात आली होती.
त्यानुसार एसीबीने २२ ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणीत काकडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, काकडे यांना कारवाईचा संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. दरम्यान, प्राप्त तक्रार व पडताळणी लाचेची मागणी निष्पन्न झाली असल्याने काकडे यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे, अकोला पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चव्हाण, दामोदर, खान, निशा, खडसे या पथकाने केली.