मुंबई विद्यापीठात ऑनलाईन पद्धतीने भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

0
54

मुंबई – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व विश्व अहिंसा दिनाचे औचित्य साधून  समाजात अहिंसा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी व मूल्याधिष्टित जीवन प्रणालीचे महत्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत शुक्रवार ०२ ऑक्टोबर  रोजी सायंकाळी ०५वाजता ऑनलाईन पद्धतीने भजनसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   या  कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुप्रसिद्ध संगीतकार  श्रीधर फडके, उस्ताद तौफिक कुरेशी, शास्त्रीय गायिका गीतिका वर्दे कुरेशी, सुप्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम आणि सन्माननीय उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते.

सर्वधर्म समभावाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी मान्यवर गायकांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी वैष्णव जन तो…, नमीला गणपती, निजरूप दाखवा, ओ पालन हारे, देहाची तिजोरी, कानडा राजा, राम भग रे मना आणि सुख के सब साथी अशी भजने आणि गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबई विद्यापीठातर्फे आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, संगीत विभाग,  राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी यांच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्यूब चॅनलवर करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विविध प्राधिकरणातील मान्यवर सदस्यांसह प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.