वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पत्राला शिक्षण विभागाने दाखवली केराची टोपली

0
36

गोंदिया,दि.१८ः- जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेतील गैरप्रकार, कर्मचार्‍यांना त्रास देणे, त्यांचे जाणिवपुर्वक वेतन अडवून ठेवणे या संदर्भातील तक्रारीवर शासन आदेशित नियमाप्रमाणे कारवाई करून कारवाईचा अहवाल संबंधित कार्यालयास सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी गत वर्षी डिसेंबर महिन्यात पाठविलेल्या पत्राद्वारे दिले होते.मात्र शिक्षण विभागाने अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पत्रालाच शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविल्याची चर्चा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात आहे.

ग्रामीण विकास संस्था चापटी/सुरगाव ता. अर्जुनी मोरगाव अंतर्गत परसटोला येथे केवळराम मेश्राम विद्यालय व खांबी/पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आहे. गैरअर्जदार संस्थेचे संचालक प्रतिभा मेश्राम, यशवंत मेश्राम, रत्नकुल मेश्राम, रत्नदीप मेश्राम, रामदास वैद्य आदींनी बनावट कागदपत्र व सह्या करून धर्मदाय आयुक्त, शिक्षण विभागाची व संस्थेची फसवणुक केली. संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन मुख्याध्यापक यशवंत मेश्राम हे कार्यरत असताना संस्थेची परवानगी न घेता त्यांनी नियमित बीएड केले आहे. या संबंधिची चौकशीची मागणी वामन मेश्राम, राजू मेश्राम, कल्पना बागडे यांनी केली आहे. गैरअर्जदार यांच्याविरोधात अर्जुनी मोर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार धर्मदाय आयुक्त व शिक्षण उपसंचालक यांना केली आहे. त्या अनुषंगाने उपसंचालकांनी 20 डिसेंबर 2023 च्या पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शासन आदेशित नियमाप्रमाणे कारवाई करून कारवाईचा अहवाल संबंधित कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र अद्यापही शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने तक्रारकर्ते वामन मेश्राम, राजू मेश्राम, कल्पना मेश्राम यांनी सदर संस्थेच्या शाळांवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.

संस्था संचालकांचा आपसी वाद आहे. संस्थेचे प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे प्रविष्ठ आहे. त्यावर निर्णय होणे आहे. कर्मचार्‍यांचे वेतन अडवू नये, शाळा व्यवस्थापनाला पत्र पाठविले आहे. प्रशासक नेमण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल आणि त्यानुसारच पुढील कारवाई होईल, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी सांगीतले.