
मुंबई : महाराष्ट्रातील दलित आश्रमशाळांच्या अनुदानाचा गेली बारा तेरा वर्षे रेंगाळत पडलेला प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन राज्याचे समाजकल्याणमंत्री विष्णू सावरा व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आश्रमशाळा कर्मचारी व संचालकांच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थांनी चालवलेल्या 290 आश्रमशाळा गेली बारा – तेरा वर्षे विना अनुदानित आहेत. सर्व विना अनुदानित आश्रमशाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरीही दलित विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या आश्रमशाळांना मागील काँग्रेस आघाडी सरकारने शेवटपर्यंत अनुदानापासून वंचित ठेवले. या शाळा चालवणारे संस्थाचालक व कर्मचारी गेली अनेक वर्षे अनुदानासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्र भाजपाने संस्थाचालकांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा दिला असून आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देखील या मुद्दाचा समावेश केला होता. राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांनीच पुढाकार घेऊन शिष्टमंडळासह मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या व अनुदानासंबंधी निवेदन दिले. त्यावेळी लवकरात लवकर या आश्रमशाळांना अनुदान देण्याचा प्रयत्न आपण करू असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष रमेश भानवे, भाजपाचे सुशांत भूमकर, रमेश सुलताने, शिवाजी महानवर, शैलेश कांबळे, संदीप सूर्यवंशी, सोहनकुमार धार्मिक, प्रसाद कुलकर्णी, विजय गायकवाड, प्रभाकर मुळे, होनराव, मुरतुडे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
