मुंबई, दि. २९ ऑक्टोबर: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ६४ हजार १८२ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. यासह बीएमएम सत्र ६ या परीक्षेचाही निकाल आज जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९६.११ टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण ३ हजार ९५७ एवढे विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण ४ हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ४ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही नमुना गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांने त्यांच्या महाविद्यालयांचे नावाची निवड करून आसन क्रमांक टाकल्यास त्यांना ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
कोट- “मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. महाविद्यालयांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ” प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ