वाशिम, दि. २९ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरीता जिल्ह्यातील ६१ रिक्त ठिकाणाकरीता २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
अर्जांचा नमुना, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पात्र, अपात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तसेच निवड प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. प्रती अर्जाची फी १०० रुपये राहणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू समिती कार्यालयातून अर्ज प्राप्त करून घेता येईल. अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, केंद्राच्या ठिकाणाची सन २०१९-२० ची कर पावती, केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच तालुका दंडाधिकारी यांनी साक्षांकित केलेले करारपत्र, संगणकीय प्रमाणपत्र (MS-CIT), इयत्ता १२ वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) धारक असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात कार्यालयीन वेळेत ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत समक्ष सादर कराव्यात. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केल्या जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित करण्यात येईल. तसेच अर्जदारांना या शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरीकाचा अर्ज आला नसेल त्यावेळी जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्राकरीता गावातील रहिवासीचा अर्ज प्राप्त झाल्यास लगतच्या गावातील अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र सुरु ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा योग्य वापर, संरक्षण व जतन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील.
आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसुचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरुपाची चूक समजून, केंद्र रद्द करण्यात येईल. एक व्यक्ती फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतात. त्याच्या कुटुंबातून दुसरा अर्ज आल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच अगोदरपासून आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरता येणार नाही.
अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची असेल तर त्याचा अर्ज रद्द करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्रचालकांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. त्यांनी केंद्राबाबत मागितलेले अहवाल तत्काळ सादर करावे लागतील. शासन निर्णयानुसार ठरवुन दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल. शासनाचे साहित्य प्राप्त झाल्यास त्याची काटकसरीने वापर करुन संरक्षण व जतन करावे लागेल.
महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्ती केलेल्या तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी करु शकतील. प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्राच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, वाशिम यांनी राखून ठेवले आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणामध्ये व संख्येत भविष्यात बदल होऊ शकतो. एका केंद्राकरीता एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा घेणे, लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास उच्च शैक्षणिक अर्हता किंवा अधिक वय किंवा यापेक्षा अन्य योग्य पर्यायाचे आधारे उमेदवाराची निवड करणे याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, वाशिम यांनी राखून ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
आपले सरकार सेवा केंद्र प्रस्तावित असलेली गावे
वाशिम तालुका (४) :- अडगाव खु., किनखेडा, शिरपुटी, वाघोली बु.
मालेगाव तालुका (११) :- बोर्डी, काळाकामठा, कुत्तरडोह, सुदी, देवठाणा खांब, खडकी इझारा, कुरळा, वाघळुद, कोलदरा, मसला खु., झोडगा बु.
रिसोड तालुका (३) :- आगरवाडी, धोडप खु., जवळा.
मंगरूळपीर तालुका (१०) :- बेलखेड, चोरद, मोतसावंगा, पिंप्री, पिंप्री बु., जांब, वरुड बु., भुर, निंबी, मसोला खु.
कारंजा तालुका (२७) :- शिरसोली, गिर्डा, मालेगाव, कोळी, बेंबर्डा, इंझा, मोहगव्हाण, शिवनगर, बेलमंडळ, जानोरी, मुरंबा, विरगाव, भड शिवणी, जयपूर, निंभा जहांगीर, वडगाव इझारा, भिवरी, काकड शिवणी, पिंपळगाव बु., खानापूर, कामठा, राहाटी, डोंगरगाव, शिवण बु., धोत्रा, कार्ली, रामनगर.
मानोरा तालुका (६) :- अजनी, गोस्ता, बोरव्हा, तोरणाळा, देऊरवाडी, सोमनाथनगर.