आयडॉलच्या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परदेशातून

0
104

मुंबई : कोविड १९ मुळे यावर्षी राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन  आयोजित केली व विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कोणत्याही परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी जेथे आहे तेथे परीक्षा या संकल्पनेनुसार आयडॉलच्या तीन विद्यार्थ्यांनी अमेरिका, फ्रान्स व जर्मनीतून तृतीय वर्ष बीएची परीक्षा यशस्वीरीत्या दिली.

आयडॉलच्या २०२० च्या तृतीय वर्ष बीए व बीकॉमची परीक्षा २६ ऑक्टोबर पासून सुरु झाली. यातील तृतीय वर्ष बीएची परीक्षा आज ४ नोव्हेंबर रोजी संपली आहे. आयडॉलचे विद्यार्थी घरी राहून परीक्षा देत आहेत. यातील काही विद्यार्थी नोकरीसाठी तर काही विद्यार्थी कोविडमुळे परदेशात अडकले आहेत. त्यांनी परदेशात राहून अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिली आहे.

अपर्णा काकिर्डे हि  विद्यार्थिनी अमेरिकेत असून तिने आयडॉलमधून अर्थशास्त्र विषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा अमेरिकेतून ऑनलाईन दिली आहे. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात,  “मी परीक्षेसाठी भारतात प्रवास न करता अमेरिकेत राहून हि परीक्षा दिली. परीक्षा देताना कोणताही अडथळा आला नाही. काही प्रश्न हे अवघड होते, परंतु सर्वसाधारण प्रश्नपत्रिका चांगली होती. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना हा पेपर अवघड होता. कोविड नंतरही अशीच ऑनलाईन परीक्षा सुरु राहावी हि अपेक्षा. अमेरिकेत राहून परीक्षा दिलेल्या अपर्णा काकिर्डे या विद्यार्थीनेने आयडॉलच्या प्राध्यापकास हा लघुसंदेश पाठविला.

अम्रिता सुभाष नंदी या विद्यार्थिनीने फ्रान्समधून  इंग्रजी विषयात  बीएची अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन दिली आहे तसेच सुरेंद्र सोळंखी हा विद्यार्थी जर्मनीमध्ये नोकरी करीत आहे. त्याने अर्थशास्त्र याविषयात बीएची अंतिम वर्षाची परीक्षा जर्मनीतून ऑनलाईन दिली आहे.