ब्रिटिशकालीन मनरो शाळेचे विद्रुपीकरण तातडीने थांबवा

0
30

भंडारा –-ब्रिटिशकालीन वास्तू असलेल्या मनरो शाळेचे विद्रूपीकरण व व्यावसायिक गाळेबांधकाम त्वरित थांबवावे, या प्रकल्पाला मंजुरी देणार्‍या अधिकार्‍यांवर कार्यवाही करावी अशी मागणी मनरो बचाव कृती समितीच्या वतीने विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागातर्फे शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भंडारा शहरात ब्रिटिशकालीन मनरो शाळा ही भव्य वास्तू १९0४ पासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. या वास्तूमुळे भंडारा जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. १00 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या या शाळेतून आजमितीस २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
आजच्या काळात येथे १८00 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या शाळेचे खेळाचे मैदान विकासकाला देऊन येथे जलदगतीने व्यावसायिक गाळेबांधकाम करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान उपलब्ध राहणार नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटणार आहे. तसेच मनरो शाळेचे भव्य दिव्य रुप कालबाह्य होणार आहे. या शाळेला हेरिटेज वास्तू (संरक्षीत इमारत) चा दर्जा देण्याऐवजी ग्राम विकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन व भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी गाळेबांधकाम करण्यास परवानगी देऊन शाळेचे विद्रूपीकरण करण्यास आपला हातभार लावला आहे.
मनरो शाळा बचाव कृती समिती तर्फे पालकमंत्री, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन सदर अवैध गाळेबांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, मनरो शाळेला हेरिटेज दर्जा देण्यात यावा, या बांधकामाला संरक्षण देणारे ग्राम विकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी मून यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव व मनरो बचाव कृती समितीचे सदस्य खिमेश बढिये, दिलीप बोकडे, किशोर देव, दिलीप राऊत, वामन खापेकर, विनोद भिवगडे, जगदीश साकुरे, संजय साखरकर, कमलेश सहारे उपस्थित होते.