राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे कोविड काळात उल्लेखनीय योगदान – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0
14

नागपूर, दि. 28: कोविड काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांचे योगदान उल्लेखनीय  राहिले असून विद्यार्थ्यांनी  अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी  दाखविलेला हा सेवाभाव  आपत्तीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.मॉरीस कॉलेज येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेतील सात कोविड योद्ध्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

आमदार  अभिजित वंजारी, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, संस्थेच्या संचालक डॉ. सुजाता व्यास, सहसंचालक संजय ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कोविड काळात सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. तरीही राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अॅम्ब्युलन्स चालवण्यापासून  मृतदेहांची पॅकेजिंग करण्यापर्यंतची कामे केली आहेत.  विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबाबत 70 टक्क्यांहूनही अधिक पालकांनी संमतीपत्र भरुन दिले. राज्यावर ओढवलेल्या अनपेक्षित संकटात पालकांनी सर्वात मोठे काम केले असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

समाजसेवेचे हे बाळकडू संस्कारक्षम पिढीत आढळून येत असून, अशा पालकांचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये महाविद्यालयीन स्तरावर सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अनिवार्य करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले पाहिजेत, यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून यापुढे राज्यातील 13 विद्यापीठांमधून उत्कृष्ट 13 स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वोकृष्ट तीन स्वयंसेवकांचा राज्यस्तरीय सत्कार करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. सामंत म्हणाले.

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने डॉ. माशेलकर समिती स्थापन केली असून, या समितीकडून नवे शिक्षण धोरण राबविण्यात येणार आहे. समितीचे हे धोरण देशातील सर्व विद्यापीठासांठी हे आदर्शवत असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली. एनएसएसचे राज्य समन्वयक अंकित प्रभू यांनी प्रास्ताविक केले. ती अनिल बनकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम समन्वयक, जिल्हा समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

 

आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार

तत्पूर्वी मंत्री उदय सामंत यांनी  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि फॉरेन्सिक सायन्स संस्थांमध्ये विविध बाबींचा आढावा घेतला. त्यामध्ये या दोन्ही संस्थांसाठी आवश्यक तो निधी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.  दोन्ही संस्थेसाठी जनित्रे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांना केल्या.