भंडारा : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शिक्षकांचे आॅक्टोंबर महिन्याचे १३ कोटी ४९ लाख २२,७५० रूपये अडले आहे. वेतन अडल्याने शिक्षकांमध्ये शिक्षक विभागाबाबत रोष व्यक्त होत आहे. थकीत वेतन त्वरीत द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघाने जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.जिल्ह्यात सुमारे तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिना संपत असतानाही माहे आॅक्टोंबरचे वेतन देण्यात जिल्हा परिषद असमर्थ ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला साकडे घातले. मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांचे वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे श्निक्षकांना सोसायटीच्या अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड पडत आहे. यासह अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत असल्याने संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात त्यांनी आॅक्टोंबरचे प्रलंबीत वेतन त्वरीत द्यावे, वेतन देयक नियमित द्यावे, प्रलंबीत देयके निकाली काढण्यासाठी रकमेची तरतुद करावी, आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना सामावून घ्यावे, शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी पदनिहाय प्रकाशित करावी, रिक्त पदे त्वरीत भरावी, चटोपाध्याय व निवळश्रेणी प्रस्तावाला त्वरीत मंजुरी देवून वेतननिश्चिती करावी, पोषण आहाराचा धान्यसाठा वेळेवर द्यावा. आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता त्वरीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ६ डिसेंबरला धरणे देण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास त्यानंतर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.