युवक काँग्रेस कार्यकारिणी निवडण्याची राहुल गांधी पद्धत दोषपूर्ण-अमर काळे

0
10

नागपुर-युवक काँग्रेसची कार्यकारिणी निवड पद्धत दोषपूर्ण असून युवक कार्यकर्ता निष्क्रिय झाला असल्याचे वक्तव्य करून आमदार अमर काळे यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधींवरच टीका केल्याने काँग्रेसजनात खळबळ उडाली. केवळ प्रक्रियेमधील तृटी दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश असल्याची सारवासारव प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.
काँग्रेसच्या विदर्भातील निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी येथील माहेश्वरी भवनात झाली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात ८ डिसेंबरला काँग्रेस शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असून त्यासंबंधीच्या तयारीसाठी ही बैठक होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार राजेंद्र मुळक व अमर काळे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अजहर हुसेन, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, तसेच या मोर्चाचे निमंत्रक आमदार विजय वडेट्टीवार, संयोजक नितीन राऊत, राजेंद्र मुळक, समन्वयक झिया पटेल, कृष्णकुमार पांडेय, रामकिसन ओझा, हुकुमचंद आमधरे याप्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
मोर्चा तयारीसंबंधीचा विषय झाल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तयार केलेल्या युवक काँग्रेसच्या ‘राहुल पॅटर्न’वर आर्वीचे आमदार अमर काळे यांनी शनिवारी काँग्रेसच्या बैठकीतच जाहीर टीका केली. ‘युवक काँग्रेसला मरगळ आली आहे. हा पॅटर्न बदलण्याची गरज आहे. यात बदल न केल्यास काही खरे नाही’, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ही भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याची विनंतीही त्यांनी केली. युवक काँग्रेस बळकट झाले तर २०१९ मध्ये काँग्रेसला सत्तेत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी विदर्भ विभागीय बैठकीत व्यक्त केला. काळे हे सध्या निलंबित आमदार आहेत. आमदार अमर काळे यांनी युवक काँग्रेसचा विषय तळमळीने मांडला. ‘युवक काँग्रेस निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडावा
आजवर विदर्भावर अन्यायच झाला. निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसने अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणावा, असे मत नितीन राऊ त यांनी मांडले. केंद्र व राज्यातील सरकारचा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यानुसार चालत असल्याची टीका त्यांनी केली.

आमदारांचे निलंबन घटनाबाह्य
विधानसभेत भाजपचे बहुमत नाही. त्यांची बहुमत सिद्ध करण्याची पद्धती नियमबाह्य आहे. कोणतेही गैरकृ त्य केले नसताना करण्यात आलेले काँगे्रस आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.