बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रातर्फे छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

0
15

‘स्वातंत्र्योत्तर मुंबई: जडणघडण व विकास’ विषयावर आधारीत छायाचित्र स्पर्धा

मुंबई, दि. ३० एप्रिल: मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्योत्तर मुंबई: जडणघडण व विकास’ या विषयावर छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या छायाचित्र स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका स्विकारली जाणार असून स्पर्धकाने एका प्रवेशिकेमध्ये विषयाशी निगडीत कॅमेरा किंवा मोबाईलफोनने काढलेली ४ छायाचित्रे [email protected] या ई-मेलवर दिनांक १२ मे २०२२ पर्यंत पाठवावित. स्पर्धकांने ई-मेलमध्ये नाव, पत्ता, मोबाईल फोन क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक अशी संपूर्ण माहिती सादर करावी. प्रत्येक छायाचित्र हे जेपीईजी स्वरूपात असावे व फाईल साईज ५ एम.बी. पेक्षा जास्त नसावा. ४ छायाचित्रांसाठी २५ एम.बी. पेक्षा कमी फाईल साईज असेल याची काळजी घेण्यात यावी. स्पर्धेसाठी सादर केलेली छायाचित्रे ही स्पर्धकाची स्वतःची निर्मिती असावी. छायाचित्रे पिकासा, फोटोशॉप किवा तत्सम छायाचित्र एडिटींग सॉफ्टवेअरच्या मदतीने बदल केलेली नसावीत. स्पर्धेसाठी सादर केलेली छायाचित्रे ही यापूर्वी कुठल्याही माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली नसावीत तसेच सदर छायाचित्रांमध्ये कोणतीही आक्षेपार्ह व अनुचित बाब नसावी याची संपूर्ण दक्षता स्पर्धकांनी घ्यावयाची आहे.

छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक बहाल केले जाणार असून प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये १० हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक पारितोषिक रुपये ८ हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये ६ हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ५ हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या छायाचित्रांचे तसेच निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ मे २०२२ च्या दरम्यान सकाळी १० ते सध्यांकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित केले जाणार आहे. या स्पर्धेत अधिकाधीक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख निलेश सावे यांच्या 9511723827 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.