वाशिम शासकीय तंत्रनिकेतनला एनबीए समितीकडून मानांकन

0
10

वाशिम, दि. 09  : वत्सगुल्म ह्या प्राचीन नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहरातील शासकीय तंत्रनिकेतन ही तंत्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. सामर्थ्याची प्रतीक असलेली कितीतरी गुणवंत विद्यार्थी या संस्थेमधून नावारूपास आलेले आहेत. या संस्थेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीटेशन (एन.बी.ए) म्हणजेच राष्ट्रीय मान्यता मंडळाचे अत्यंत प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. वाशिम शासकीय तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर मिळालेल्या ह्या मानांकनाला विशेष महत्त्व आहे.

           तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन वाशिमचे प्राचार्य डॉ. बी जी गवलवाड, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी एनबीए मानांकनासाठी विशेष परिश्रम घेतले. गुणवत्तेची ही गरुड भरारी म्हणजे संस्थेच्या शिस्तबद्ध आणि काटेकोर परंपरेचा विजय म्हणूनही या यशाकडे पाहावे लागेल.

            एनबीए समितीने २२ ते २४ एप्रिल २०२२ या दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन वाशिमला प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षण प्रणाली, उपलब्ध असलेल्या सर्व सोयी सुविधा, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची सखोल तपासणी केली होती. यामध्ये टिचिंग लर्निंग प्रोसेस, स्टुडन्ट सक्सेस रेट, करियर गायडन्स, प्लेसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांचा फीडबॅक, आउटकम बेस एज्युकेशन याचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर संस्थेमधील ग्रंथालय, वर्कशॉप, प्रथम वर्षाच्या सर्व प्रयोगशाळा, संस्थेचे कार्यालय, जिमखाना व उपहारगृह या सर्व बाबींचे परीक्षण करून समितीने आपला अहवाल उच्चस्तरीय बोर्डाकडे सादर केला.

           शासकीय तंत्रनिकेतन, वाशिमची कामगिरी उल्लेखनीय ठरल्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीटेशन समितीकडून प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या या दैदीप्यमान यशामुळे संस्थेच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या हजारो आजी-माजी विद्यार्थ्यांची, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अंतःकरणे शब्दातीत आनंदाने भरून जावीत, असा हा क्षण यशाचा एक प्रातिनिधिक परिचय म्हणावा लागेल.