मुंबई, २१ जून: मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठात सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होणार आहेत. २२ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावरून पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रणाली तयार केली आहे. विद्यापीठातील विविध विद्याशाखानिहाय राबविण्यात येणाऱ्या एकूण ५३ पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १७ अभ्यासक्रम, मानव्य विद्याशाखेतील २९ अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील २, आणि आंतरशाखीय विद्याशाखेतील ५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया आणि अर्ज सादर करणे– २२ जून, २०२२ ते ०४ जुलै २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
- विभागामार्फत ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी– ०५ जुलै, २०२२ ते ११ जुलै, २०२२ (स.११.०० वाजे पर्यंत)
- तात्पूरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी जाहीर करणे– १२ जुलै, २०२२ (सायं. ६.०० वाजेपर्यंत.)
- विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास– १३ जुलै, २०२२ (सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत)
- अंतिम गुणवत्ता यादी– १५ जुलै, २०२२ (सायं. ६.०० वा.)
- ऑनलाईन शुल्क भरणे– १६ जुलै, २०२२ ते १९ जुलै,२०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाने अतिशय सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली तयार केली असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ट्यूटोरिअल आणि तांत्रिक अडचण उद्भवल्यास इमेल आयडीवर संपर्क करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे ते पेमेंट गेट-वेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार २१ जुलै, २०२२ पासून नियमित लेक्चर्सना सुरुवात होणार आहे.
डॉ. लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)