देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सुयश

0
44

देवरी, दि.13- देवरीच्या इतिहासात नावलौकीक असलेल्या आणि गतकाळात बंद पडलेली जिल्हा परिषद हायस्कूल पुन्हा एकदा नावारुपास आली आहे. या शैश्रणिक सत्रात एकूण 7 विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मिहीर काशिवार, हिमांशू डोंगरे, विधी गेडाम, अर्णव उईके, हर्षा सयाम,प्रथमेश मेश्राम आणि लिशा नरेटी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

देवरी येथील अडगळीत गेलेले जिल्हा परिषदेचे विद्यालय हे कधीकाळी शिस्तप्रिय आणि भव्यदिव्य विद्यालय म्हणून सुप्रसिध्द होते. मात्र, कालपरत्वे शिक्षणाचे खासगीकरण आणि प्रशासकीय उदाशिनता यामुळे या विद्यालयाकडे विद्यार्थी आणि पालकांनी पाठ फिरवली होती.

आता हीच शाळा गेल्या तीनवर्षापासून विद्यार्थ्यामुळे पुन्हा फुलत चालली आहे. केवळ 17 विद्यार्थी संख्येपासून सुरू झालेल्या या विद्यालयात आजमितीला सुमारे 400 विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहे. आतापर्यंत या शाळेतून नवोदय प्रवेश परीक्षेत सत्र 18-19 ला 2 विद्यार्थी, 19-20 ला 9 विद्यार्थी, 20-21 ला 10 विद्यार्थी व यावर्षी सत्र 21-22 ला 7 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शाळेचे शिक्षक सयाम व वाघदेवे यांना दिले आहे. या उत्कृष्ठ यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.