महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

0
20

गोंदिया दि. 31, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

            शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2023 मध्ये घेण्यात येणा-या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणा-या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरून आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे.