” मनशक्ती क्लिनिक ” द्वारे आरोग्यवर्धिनी केंद्रात दिली जाणार मानसिक आरोग्य सेवा- डॉ. नितीन वानखेडे , 

0
9
गोंदिया- बदलती जीवनशैली, वातावरण, स्पर्धात्मक जीवन, अचानक उद्भवलेली महामारी, जगण्यातील अनिश्चितता इत्यादीमुळे समाजात ताण, तणाव, भीती, नैराश्य, चिंता इत्यादी मानसिक विकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणजे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अभ्यासामधून असे आढळून आले आहे की भारतामध्ये चार पैकी एक व्यक्ती हा त्याच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या मानसिक समस्यांना सामोरे जातो.

परंतु आपल्या समाजात शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजारांना महत्व दिले जात नाही, मानसिक आजाराबद्दल समाजामध्ये सध्या तरी म्हणावे तितके जनजागृती, सकारात्मक आली नाही थोडक्यात सांगायचे झाले तर मानसिक विकार, आजार हे दुर्लक्षित केले जातात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये परंतु, आरोग्यदायी समाजासाठी ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. त्याकरिता समाजातील प्रत्येक स्तरावर मानसिक आजार हा कलंक नसून शारीरिक आजाराप्रमाणेच एक आजार आहे हे सर्वांना पटवून देणे गरजेचे आहे. ते दुर करण्यासाठी शासनाने आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली. त्याकरीता आरोग्यवर्धिनी केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक परिचारिका व बहुउद्देश्य कर्मचारी यांचे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्य विषयी प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली.
 मनशक्ती क्लिनिक  शाश्वत विकासाचे ध्येय-
प्रतिबंध आणि उपचाराद्वारे असंसर्गजन्य रोगामुळे एक तृतीयांश अकाली मृत्यू कमी करणे आणि मानसिक आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे.
 मनशक्ती क्लिनिक  उपक्रमाचे उद्दिष्टे –
मानसिक समस्यांचे गांभीर्य बघता मानसिक आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज बनली आहे. मानसिक आरोग्य सेवा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याकरिता मनशक्ती क्लिनिक उपक्रम जिल्हात सुरू करण्यात येत आहे.

 • सर्वांसाठी, विशेषता सर्वात असुरक्षित आणि वंचितांसाठी किमान मानसिक आरोग्य सेवेची उपलब्धता आणि सुलभता सुनिश्चित करणे.
 • सामान्य आरोग्य सेवेमध्ये आणि सामाजिक विकासामध्ये मानसिक आरोग्य ज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
 • मानसिक आरोग्य सेवेच्या विकासामध्ये समुदायाचा सहभाग वाढवणे आणि समुदायांमध्ये मदतीसाठी प्रयत्नाना चालना देणे.

वर्तणुकीवर परिणाम करणारे विशिष्ट घटक

 • ताण तणाव
 • पूर्वानुभाव
 • शरीरातील अंतर्गत बदल
 • सुक्त मानसिक प्रक्रिया
 • वय
 • सामाजिक नियम

 मनोविकाराचे प्रकार-
1) सायकोसिस-  मनोविकाराच्या तीव्र व्याधी
2) मूड डिसॉर्डर -उन्माद विकार व नैराश्य
3) न्युरॉसिस – मनोविकाराच्या सौम्य व्याधी
4) इतर – फिटस येणे ,मतिमंदत्व, दारु व इतर व्यसने.
 मनोविकारांची कारणे-

 • मेंदूत बिघाड
 • अनुवंशिक कारण
 • लहानपणातील अनुभव
 • घरातील वातावरण
 • इतर कारण जसे गरीबी, बेकारी, अन्याय, असुरक्षितता, तीव्र चढाओढ आणि सामाजिक भेदभाव यामुळे सुद्धा मनोविकार होण्यास हातभार लागतो.

 लक्षात ठेवा मनोविकारांचे प्रमुख काही प्रकार –
सायकोसिस – भीती वाटणे, भास- भ्रम होणे ,संशयी वृत्ती वाढणे, विनाकारण आक्रमक होणे, शिवीगाळ करणे, स्वतःची काळजी न घेणे, एकटेच/ हसणे/ रडणे/ बडबडणे/ हातवार करणे, एकलकोंडेपणा, झोप न लागणे.
मँनिया – विनाकारण अतिउत्साही/ आनंदी राहणे, अवाजवी जास्त बडबड करणे, अनावश्यक खर्च /प्रवास करणे, अतिक्रियाशील होणे, असंबंद्ढ बोलणे, झोपेची गरज न भासणे.
 नैराश्य – सतत उदास/ निराश वाटणे, कामात मन न लागणे, नकारात्मक विचार येणे,  पूर्वीसारखा उत्साह न रहाणे , भूक- झोप न लागणे, जीवन निरर्थक वाटणे, आत्महत्येचे विचार/ प्रयत्न करणे, चिडचिडपणा इत्यादी.