“मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी प्रवेशाची गुढी उभारावी”- डॉ विजय सूर्यवंशी

0
16

गोंदिया,दि.29- जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चालली आहे, खाजगी शाळेच्या तुलनेत जि. प. शाळांमध्ये प्रतिभासंपन्न, प्रशिक्षित ‘पूर्ण पगारी’ शिक्षक असूनही जि. प. शाळा ओस पडत चालल्या आहेत. परिणामतः काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. करिता शिक्षकांनी विविध तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी सज्ज रहावे. तसेच मराठी नववर्ष गुढीपाडवा या मंगलप्रसंगी विद्यार्थी प्रवेशाची गुढी शाळाशाळांत उभारली जावी. हा उपक्रम राज्यभर राबविला जावा असे प्रतिपादन गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले. रविवार दि. २८ ला, सहयोग शिक्षक मंचाच्या सहविचार सभेत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे मार्गदर्शनपर ते बोलत होते.

 डॉ सूर्यवंशी म्हणाले, प्रत्येक शाळेचे फेसबूक पेज तसेच ब्रोशर तयार करून शाळेची वैशिष्ट्ये गुढीपाडव्याच्या दिवशी  समाजाला माहित करावीत. प्रत्येक शाळेचे माजी विद्यार्थी संघटन तयार करावे, मेळावे देखील घेऊन उच्च पदस्थ विद्यार्थ्यांना शाळेची उतराई होण्याची संधी द्यावी.    गणिताची भीती दूर होण्यासाठी उत्कृष्ट व आवड असणाऱ्या शिक्षकांची  ‘मॅथ कमांडोज’ म्हणून निवड करून  जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना गणित विषय सोपा करून शिकविण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. १००% गाव साक्षर करण्यासाठी शिक्षकांनी थोडी अधिक मेहनत घेतली तर हे शक्य होईल, जेणेकरून याची दखल राज्यभर घेऊन महाराष्ट्र १००% साक्षर होण्यास मदत होईल.
वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे करिता बसच्या मदतीने ‘फिरती शाळा’ राबविण्याचा विचार असून यासाठी लगेचच पाऊल उचलले जाईल. विद्यार्थ्यांचे ‘हस्तनेत्र कौशल्य’ तथा हस्ताक्षर सुधारण्यासाठी ‘गिरव पाटी’ पर्याय खूप चांगला आहे.   जिल्ह्यात सुरू असलेली डिजीटल चळवळ गतिमान होत आहे. शिक्षकांच्या विनंतीमुळे संदीप गुंड यांच्या दि. ०६ मार्चच्या  कार्यशाळेला देखील वेळ देणार असल्याचे  यावेळी त्यांनी सांगितले तसेच नाविन्यपूर्ण निधी देखील सॉफ्टवेअर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.गुढीपाडव्याच्या दिवशी शाळाशाळांत उंच गुढी उभारून; गावकरी, पालक, पदाधिकारी यांना शाळेत पाचारण करून, विद्यार्थ्यांना पुष्प, घाटी, अभिनंदन पत्र देऊन पालकांसह त्यांचे स्वागत करावे असे सांगितले. यावेळी सहयोग शिक्षक मंचाचे, हेमराज शहारे, युवराज माने, अशोक चेपटे, पुरूषोत्तम साकुरे, अरविंद कोटरंगे, सच्चिदानंद जीभकाटे, युवराज बडे, गोपाल बिसेन, अनिल मेश्राम, सुंदर साबळे, विजेंद्र केवट, श्रीकांत कामडी, प्रमोदकुमार बघेले आदी उपस्थित होते.