बनावट स्वाक्षरी करून ५० शिक्षकांची बदली

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नांदेड- नांदेड जिल्हा परिषदेतील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांची बनावट स्वाक्षरी करून १४/७६ या एकाच आदेशावर तब्बल ५० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय आहे. दरम्यान, बोगस बदल्या करणा-या व ज्यांच्या बदल्या झाल्या अशा शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुरुवातीस २० शिक्षकांनी १४/७६ या एकाच आदेश क्रमांकावर बदल्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणासंबंधी शिक्षकांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर आणखी ३० शिक्षकांवरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दीड ते दोन लाख रुपये प्रत्येक बदलीसाठी संबंधित दलालांनी घेतल्याची चर्चा आहे. आतापर्यंत बिलोली, देगलूर, नायगाव, मुखेड, भोकर, हिमायतनगर तालुक्यात बदली प्रकरणात अडकलेल्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आवक-जावक रजिस्टरवर १४/७६ या एकाच क्रमांकाच्या बनावट आदेशावर बदल्या करण्यात आल्या असून याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याचे शिक्षण सचिव व शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली