शासकीय बीएड महाविद्यालय बंद पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी

0
19

भंडारा- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालय बंद पाडण्याचे प्रशासनाचे षडयंत्र अयशस्वी झाले आहे. सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी गुरुवारी रात्रीपयर्ंत ठिय्या आंदोलन करीत बीएड प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शेवटी शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व सोपस्कार पूर्ण करीत नागपूर विद्यापीठाला पाच सदस्यीय समिती स्थापन करून संलग्नीकरण करण्यासाठी पाचारण केले.
भंडारा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे संलग्निकरण नागपूर विद्यापीठाशी करणे आवश्यक होते. परंतु, सदर महाविद्यालयाने संलग्निकरण करून वर्धित मान्यता घेतली नव्हती. अखेरीस आंदोलन करीत सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी जोपर्यंत नाव अँडमिशन पोर्टलवर येत नाही, अँडमिशन प्रक्रिया प्रारंभ होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयातून हटणार नाही, मुक्काम महाविद्यालयातच ठोकणार असा पवित्रा घेतला. शेवटी शिक्षण प्रशासन व नागपूर विद्यापीठाने आंदोलनापुढे नमते घेत तडकाफडकी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समिती १८ नोव्हेंबरला महाविद्यालयात डॉ. विद्या भारंबे यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय चौकशी व संलग्निकरण समिती स्थापन करण्यात आली. यानंतर पोर्टलवर महाविद्यालयाचे नाव येवून रितसर प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. बी. एड. महाविद्यालय आंदोलनात सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांचे समवेत स्नेहा रणदिवे, तनुजा बंसोड व प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.