दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांनंतर १०० टक्के अभ्यासक्रम

0
19

नागपूर -राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून नागपूर विभागीय मंडळाने परीक्षेची बहुतांश तयारी पूर्ण केली आहे. करोनानंतर दोन वर्षांनी विद्यार्थ्यांची परीक्षा ही शिक्षण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. याशिवाय पूर्ण अभ्यासक्रावर परीक्षा राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही जोमाने तयारी करण्याचा सल्ला शिक्षक व पालकांकडून दिला जात आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी केंद्रांची आखणी केली असून बहुतांश केंद्रांमध्ये उत्तरपत्रिकांचे वितरणही करण्यात आले आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा म्हणजे अग्निपरीक्षा राहणार आहे. करोना काळामध्ये पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. तर मागील वर्षी गृह महाविद्यालय परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याशिवाय परीक्षेसाठी ७५ टक्के अभ्यासक्रम देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती नव्हती. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावरही दिसून आला. कधी नव्हे ते दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ९९ टक्क्यांपर्यंत होती. त्यामुळे परीक्षा पद्धतीवर आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र, यंदाच्या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय शंभर टक्के अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे यंदाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी कसोटी ठरणार आहे.

कुठे किती परीक्षार्थी?
इयत्ता १०वी बद्दल बोलायचे झाल्यास, यावर्षी नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ५३ हजार ५२३ परीक्षार्थी असतील. त्यापैकी सर्वाधिक ५९ हजार १८० विद्यार्थी नागपूरचे असतील. नागपूर विभागात एकूण ६८२ परीक्षा केंद्र असतील. त्याचप्रमाणे बारावीच्या नागपूर विभागातील १ लाख ५५ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये नागपुरातून ६२ हजार ३६१ परीक्षार्थींचा समावेश होणार आहे. नागपूर विभागात ४८४ परीक्षा केंद्रे असतील.

२१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा
शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरू होत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पेपर होणार आहे. १२वीची परीक्षा २१ मार्चपर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे, दहावीची परीक्षा २ मार्चपासून प्रथम भाषेसह (मराठी, हिंदी, उर्दू आणि इतर स्थानिक भाषा) सुरू होईल. ही परीक्षा २५ मार्चपर्यंत चालणार आहे