गडचिरोलीच्या लेडी टॅक्सी चालक किरणची भरारी,इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

0
10

गडचिरोली: नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात लेडी टॅक्सी चालक अशी ओळख असलेल्या किरण कुर्मा या तरुणीला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. तिचं याबद्दल सर्वत्र कौतुक केलं जात आहे.अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील किरण रमेश कुर्मा (२५ वर्षे) हिची ओळख म्हणजे ‘लेडी टॅक्सी चालक’ अशी आहे.वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून उदरनिर्वाहासाठी स्वतःचे प्रवासी वाहन चालवणे हे किरण कुर्माचं काम आहे. महिलांनी चार चाकी वाहन चालविणे हा आता कौतुकाचा विषय राहिलेला नाही पण अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन एखादी युवती नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात चक्क प्रवासी घेऊन टॅक्सी चालवते तेव्हा ती कौतुकाचीच नाही तर आश्चर्याचा सुखद धक्का देणारी बाब ठरते.याचीच दखल घेऊन केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही तिचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे तिला आज विदेशात शिक्षण घ्यायची संधी चालून आली आहे.किरणला आधीपासूनच उच्च शिक्षण घेण्याची जिद्द होती. हीच जिद्द उराशी बाळगून किरणने हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश मिळविला. तेथे अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पण, घरची परिस्थिती बेताची असल्याने २०१८ ला घरी परतून तिने वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचे ठरविले. परंतु, त्या भागात मुलीने प्रवासी वाहन चालविणे सोपे नव्हते. घनदाट जंगल, डोंगराळ भाग असूनही न डगमगता किरणने तीन वर्षे टॅक्सी चालविली. सुरुवातीला किरणच्या टॅक्सीतून प्रवास करायला लोक घाबरायचे, पण काही काळाने त्यांची भीती दूर झाली.

एक तरुण मुलगी टॅक्सी चालवताना बघून अनेकांना आश्चर्य वाटायचे. पण, किरणच्या मनात कधीच तिने निवडलेल्या क्षेत्राबद्दल साशंकता नव्हती. मात्र, मनात असलेली उच्च शिक्षणाची जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती. मग तिने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल हे शोधणे सुरू केले. बीड येथे एकलव्यच्या कार्यशाळेत तिची भेट राजू केंद्रे आणि विशाल ठाकरे यांच्याशी झाली. त्यांनी तिला प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. या जोरावर किरणने विदेशातील काही विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालू केले.किरण कुर्मानं २०२२ सप्टेंबरमध्ये काही विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षा दिली, यात तिला यश मिळाले. जगात ८६ वे मानांकन असलेल्या इंग्लंडमधील ‘लीड्स’ विद्यापीठात एमएससी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा सारख्या दुर्गम भागातून येऊन सुध्दा जिद्द आणि संघर्षाच्या बळावर मिळविलेल्या यशाबद्दल किरणचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु, हा संघर्ष इथेल संपलेला नाही. प्रवेश तर मिळाला पण विद्यापीठाचे २७ लाख इतके शुल्क कुठून भरावे हा नवा प्रश्न किरणपुढे उभा ठाकला आहे. त्यासाठी शासन किंवा एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळेल का यासाठी तिचा शोध सुरू आहे.