आंबेडकरी गझल संमेलन,संमेलनाध्यक्ष पदी प्रमोद वाळके ‘युगंधर’

0
18

डाॅ. इकबाल मिन्ने यांची उद् घाटक म्हणून निवड

अमरावती येथे संमेलनाची जय्यत तयारी.

अमरावती: ४ मार्च रोजी अमरावती येथे नियोजित आंबेडकरी गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार आणि अभ्यासक प्रमोद वाळके यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

प्रमोद वाळके यांचे हे गाव कुणाचे आहे? , बैनाई, उजेडाचे नवे वळण हे कविता संग्रह आणि स्पंदन निळ्या नभाचे, प्रश्नांची गझल, गझल श्रावस्ती हे गझलसंग्रह प्रसिद्ध असून संग्रामपिटक या पुस्तकात त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या गझला संपादित केल्या आहेत. यशवंत मनोहरांचे सौंदर्यविश्व आणि टिकासौंदर्य हे समिक्षा ग्रंथ सुद्धा विशेष उल्लेखनीय आहेत. लेखक, कवी, गझलकार आणि समीक्षक म्हणून सुप्रसिद्ध असलेले प्रमोद वाळके ‘युगंधर’ आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाचे प्रवर्तक सुद्धा आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीमुळे एका वैचारिक प्रतिभेचा सन्मान झाला असल्याची भावना आयोजकांमध्ये आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर अमरावती येथे आयोजित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर वी. रोकडे हे भुषविणार आहेत. अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या मार्गदर्शनात अमरावती येथील ‘आशय’ ही संस्था या संमेलनाचे आयोजन करत आहे.

उद् घाटकीय सत्रात ज्येष्ठ गझलकार अशोक बुरबुरे, सनदी अधिकारी प्रशांत रोकडे, महामंडळाच्या अध्यक्षा सीमा मेश्राम, निमंत्रक प्रशांत वंजारे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ सागर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिचर्चा आयोजित केली असून त्यात डॉ. संजय पोहरे, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. सिद्धार्थ भगत, डॉ. युवराज मानकर आदी मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.
डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा आयोजित केला असून महाराष्ट्रातील ख्यातनाम गझलकार त्यात सहभागी होणार आहेत. संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास थोरात, रोशन गजभिये, राजेश गरुड,धर्मशील गेडाम, संघपाल सरदार, संजय मोखडे, अश्विनी गडलींग,गणेश लांडगे, दिगंबर झाडे,राहुल वासेकर,वर्षाताई गरुड, सुमेधाताई खडसे,सुनंदा बोधिले रक्षणाताई सरदार, गुणराज भगत, अण्णा वैद्य, संजय शेजव, विक्रांत मेश्राम, गजानन बन्सोड, राजेश नाईक इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.