मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समांरभ आज 

0
5

विविध विद्याशाखांतील एकुण २,०७,१४५ स्नातकांना पदव्या

२७० स्नातकांना पी.एच.डी व २३ एम. फिल तर १९ पदके

मुंबई, दि. २3 फेब्रुवारी – मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती  रमेश बैस भूषवणार आहेत. तर सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे  मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, चंद्रकांत (दादा) पाटील, आणि अध्यक्ष, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच व अध्यक्ष, राष्ट्रीय मूल्यांकन मंडळ, नवी दिल्ली, प्रा. (डॉ.) अनिल सहस्त्रबुद्धे हे लाभले आहेत. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर टी. शिर्के , प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य (डॉ.) अजय एम. भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) सुनिल भिरूड  यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित राहणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

ज्या स्नातकांनी पदव्यांसाठी आणि पदवीकांसाठी स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे त्यांना पदवी प्रदान करण्यासाठी या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण २,०७,१४५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ०१ लाख ०९ हजार ३७४ मुले तर ९७ हजार ७७१ मुलींचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ७५ हजार ६०२ तर पदव्युत्तरसाठी  ३१ हजार ५४३ विद्यार्थ्यांच्या पदव्यांचा समावेश आहे. तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या  ७९ हजार २२० आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी १८ हजार ५५१ एवढी आहे. मुलांमध्ये पदवी स्नातकांची संख्या ९६ हजार ३८२ आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी १२ हजार ९९२ एवढी आहे.

विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविद्या शाखेसाठी २६ हजार ६४५, आंतरविद्याशाखेसाठी ४ हजार ९३७, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १ लाख १९ हजार ५५९ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५६ हजार ००४ पदव्यांचा समावेश आहे.

विविध विद्याशाखेतील २७० स्नातकांना विद्यावाचस्पती ( पी.एचडी) व २३ एम. फिल. पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १७ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि  यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.