शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज तात्काळ सादर करा – विनोद मोहतुरे

0
16

गोंदिया, दि.27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही केंद्र-राज्य यांच्याद्वारे संयुक्तिकरीत्या राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र-राज्य हिस्सा ६०:४० असा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल नव्याने कार्यान्वित झाले असून संबंधितांनी शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज तात्काळ सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

      hhtp://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विविध योजनांकरिता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज नोंदणीकृत केले जातात. शैक्षणिक सत्र २०२२-२३ करीता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणाली २२ सप्टेंबर २०२२ पासून कार्यांवीत करण्यात आलेली आहे. तरी मागील वर्षाचे तुलनेत जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आतापर्यंत ९३ टक्के अर्ज भरण्याची नोंद झालेली आहे. सदर बाब लक्षात घेता आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज नोंदणी केलेली नसल्याने ते योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

       शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०० टक्के ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत होण्याकरिता व महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत शासनस्तरावर आढावा घेण्यात येत आहे. राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची काळजी विभागामार्फत घेण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी व त्रुटीपूर्तता करून अंतिमरीत्या मान्यतेस्तव समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. तसेच सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित अर्जाचा निपटारा तात्काळ करावा.

        सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ सादर करावेत व तसे न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची तसेच संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. करिता जिल्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच प्राचार्य यांनी विहित वेळेत पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, असे आवाहन विनोद मोहतुरे सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.