तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

0
10

गोंदिया, दि.27 : प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जोपासून क्षयरुग्ण शोधण्यास हातभार लावावे व आपला देश 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करावे, असे प्रतिपादन वरिष्ठ  क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक संजय रेवतकर यांनी केले.

        ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे 24 मार्च रोजी क्षयरोग बाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पाटील व क्षयरोग उपचार पर्यवेक्षक देवेंद्र भाजीपाले उपस्थित होते.

        क्षयरोगाचे लक्षणे, लवकर निदान तपासणी करण्याच्या पध्दती व उपचार यावर सविस्तर माहिती देऊन पुढे सांगितले की, जर एखादा क्षयरुग्ण औषध घेत नसेल तर तो एका वर्षात 20 रुग्ण तयार करतो. म्हणून समाजातील अशा व्यक्तींचा शोध घेण्यास प्रयत्नशील राहावे असे आवाहन संजय रेवतकर यांनी यावेळी केले.

        क्षयरोगाचे औषधोपचार सुरु असतांना रुग्णांनी घ्यावयाची काळजी यावर विस्तृत माहिती सांगून प्रत्येक व्यक्तीने आहाराकडे विशेष लक्ष देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा असे डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

        देवेंद्र भाजीपाले यांनी निक्षय मित्र योजना, डीबीटी याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र भाजीपाले यांनी केले, उपस्थितांचे आभार सचिन हटवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास कठाणे, रविना खोटेले, संदिप थाटकर व श्री. कोकरे यांनी सहकार्य केले.