आंध्र विद्यापीठाद्वारे माजी सैनिकांना कला शाखेची पदवी मिळणार

0
5

भंडारा, दि. 18 मे : जिल्हयातील माजी सैनिकांना सुचित करण्यात येते की, केंदिय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात कला शाखेतुन BA (HRM) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करुन देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे.

माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत, त्यामुळे आंध्र विद्यापीठासी झालेल्या कराराव्दारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापीठाव्दारे कला शाखेतून BA(HRM) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा ईच्छुक माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.