नापासांना धीर द्या.

0
24

आज २५ में रोजी १२वी चा निकाल लागत आहे. काही मुलं आपल्या निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत तर काही निकालाच्या नावानं घाबरत सुध्दा आहेत. कारण काही मुलं पास होतील तर काही नापास.

बारावी अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्याचं लाखमोलाचं आयुष्यच वाया जातं. त्यांची प्रगती कायमची खुंटून जाते. असं समजणाऱ्या विद्यार्थ्यांना, उत्तीर्ण विद्यार्थांच्या यशाचा आनंद साजरा होतो त्यावेळी त्यांना फार दु:ख होतो.
अशावेळी शासन, शिक्षण मंडळ, शिक्षक आणि पालक या सगळ्यांनी नापासांचाही विचार करायला हवा…

हसरे मूल सगळ्यांचे असते. पण रडके मूल मात्र फक्त त्याच्या आईचे असते. नापास होणाऱ्या मुलांची अवस्था त्याहूनही वाईट असते. त्यांना कोणीच वाली नसतो. शिक्षक तर सोडाच, पण आई-वडीलही त्यांना पाठीशी घालत नाहीत. या मुलांसाठी काही करता येईल का?

आपल्याकडे १०वी व १२वी या स्तरावरील परीक्षांच्या निकालाकडे सगळ्यांचेच विशेष लक्ष असते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकसोहळे आयोजित केले जातात आणि हे सारे ठीकही असते. पण नापास झालेल्या मुलांची कोणी दखलही घेत नाही.

१२वीनंतरही पदवी स्तरावर मुले नापास होतात, पण त्याची फारशी चर्चा होत नाही. समाजाच्या दृष्टीने पास- नापास हा प्रश्न मुख्यतः १०वी व त्याखालोखाल १२वी या परीक्षांपुरताच मर्यादित आहे असे दिसते.
नापास विद्यार्थ्यांचा वर्ष वाया जाऊ नये हे लक्षात घेऊनच राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या विद्यार्थ्यांची महिन्याभरातच पुन:परीक्षा घेण्याचा निर्णय घोषित केला असावा.
या मुलांसाठी ए. टी. के. टी. चे नियम लागू करुन त्यांना पुढे सरकवण्याचा हा प्रयोगही करून झाला आहे. आता आणखी वेगळा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एकदा नापासाचा शिक्का बसला की त्यातून मानसिकदृष्ट्या बाहेर येणे फार अवघड असते.
१०वी व १२वी या परीक्षांना नापास होणारा विद्यार्थी स्वतः त्याच्या अपयशाला मुख्यतः तोच जबाबदार असतो हे मान्य केले तरी या व्यवस्थेचे भाग असणारे सर्वजण काही न काही अंशाने याला जबाबदार असतात, हे मान्य करण्यास काय हरकत आहे?

विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी त्याला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी तरी निदान या व्यवस्थेची आहे की नाही?

आधी इंग्रजी, गणित यासारखे हमखास नापासीचे विषय टाळून एस. एस. सी. होता येत होते. राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला.

आजही बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पदवी चे शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.

गेल्या काही वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाने बेस्ट ऑफ फाइव्हचे सूत्र स्वीकारले आहे. सी.बी.एस.ई.च्या विद्यार्थ्यांशी होणाऱ्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत या विचारातूनच हे सूत्र पुढे आणले गेले आहे.

पण या सूत्राची तितकीच गरज नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे याची दखलच घेण्यात आलेली नाही. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कोणत्याही पाच विषयातील गुण लक्षात घेऊन त्यांना उत्तीर्ण घोषित करता येईल का याचा विचार व्हायला हवा. कदाचित इंग्रजी व गणित या विषयात या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळणार नाहीत. पण सर्वच विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणितात किमान पात्रता मिळायलाच हवी हा आग्रह कशासाठी?

रिक्षा परमिट, वाहन चालक परवाना, इत्यादी स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. केवळ एस. एस. सी. नाही म्हणून अडलेले, लांबलेले वैवाहिक संबंधही जुळून येतील (आणि हे मुलींइतकेच मुलांच्याबाबतही खरे आहे). थोडक्यात, यामुळे आर्थिक व सामाजिक विकसनाची दारे खुली होतील…

यादृष्टीने यापूर्वी काही प्रयत्न झाले आहेत. शिक्षक व पालक यांच्याखेरीज शिक्षण मंडळ व शिक्षण संस्था यांनीही प्रयत्न केले आहेत.

शिक्षण संस्थांच्या स्तरावरही यादृष्टीने काही काम झाले आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना यशाचा मार्ग दाखवण्याची किमया करून दाखवणे अशक्य नाही.

———————

महेन्द्र सोनेवाने, गोंदिया.