मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्हच!:भाजप हायकमांडकडून परवानगी मिळत नसल्याने विषय रखडला

0
14

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन ११ महिने उलटले तरी अजून मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसल्याने दोन्ही पक्षांचे आमदार त्रस्त आहेत. कोर्टाने सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले असले तरी भाजपचे हायकमांड हिरवा कंदील दर्शवत नसल्याने मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्रिपद सोडून शिंदेंसोबत आलेले प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू त्यामुळे वारंवार संताप व्यक्त करत आहेत.

अखेर बुधवारी कडू यांना मंत्रिपद नसले तरी तो दर्जा असलेले दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्षपद बहाल करून शांत करण्यात आले, पण त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणार असल्याचे संकेत मिळाले. बच्चू कडू हे गेली २० वर्षे अपंग कल्याणाचे काम करतात. त्यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात ‘दिव्यांग कल्याण’ नावाने ३३ वे स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. त्याचे मंत्रिपद कडू यांनाच मिळणार असे संकेत दिले जात होते. पण ते काही झाले नाही. आता या मंत्रालयाच्या वतीने जून महिन्यात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय अपंगाच्या दारी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदी कडू यांची वर्णी लागली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही बहाल केला.

मंत्रिमंडळ विस्तारावर सातत्याने कडू सवाल करत होते म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कडू यांच्या मतदारसंघातील रखडलेले अनेक प्रकल्प मध्यंतरी मार्गी लावण्यात आले हाेते. तरीही कडू यांचे सरकारवर प्रहार चालूच आहेत. त्यामुळे कडू यांना मंत्रिपद देता येत नसले तरी मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. एक प्रकारे कडू हे ‘असंतोषाचे जनक’ ठरू नयेत म्हणून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे मानले जाते.

शिंदे गटाचे शेवाळे, प्रतापरावांना केंद्रात मंत्रिपद मिळणे शक्य
मुंबई | राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने एकीकडे शिंदे गटाचे आमदार नाराज असले तरी त्यांच्या दोन खासदारांना मात्र केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात मुंबईचे खासदार राहुल शेवाळे व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव या दोघांच्या नावावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यात एक कॅबिनेट तर दुसरे राज्य मंत्रिपद असू शकेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण १८ खासदार निवडून आले होते. पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ १३ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. दरम्यान, आता १० जूनपर्यंत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे गटाला संधी मिळू शकते. गजानन कीर्तिकर यांचेही नाव यापूर्वी मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांचे नाव मागे पडले व विदर्भाला संधी मिळण्याची आशा आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन दिवस निघाले दिल्लीला
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार महापालिका निवडणुकानंतर होईल, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार प्रथम होईल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मार्गी लागेल, असेही सांगितले जाते. या शनिवारी, रविवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी हा दौरा आहे. पण, या दौऱ्यात रखडलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागेल, अशी इच्छुकांना अपेक्षा आहे.