उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने मुंबई विद्यापीठाचे एक पाऊल पुढे

0
7

अमेरिकेतील इलिनॉइस आणि सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आयोजित  ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२३’ या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठांनी केल्या करारावर सह्या  

नवी दिल्ली, दि. ३० जुलैः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२३’ या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर करार करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आणि पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत आज शैक्षणिक सामंजस्य करार केले. केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार, सचिव प्रा. मनिष जोशी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक प्रा. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि इलिनॉइस विद्यापीठातर्फे प्रा. मार्टिन बर्क आणि सेंट लुईस विद्यापीठातर्फे प्रा. एरिक ऍम्ब्रेख्त यांनी कराराववर सह्या केल्या. प्रगत आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी करण्यात आलेल्या या करारान्वये उच्च शिक्षणातील संधीचे विविध दालन खुले होणार आहेत. अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान अशा विविध विषयांवर शैक्षणिक सहकार्यासाठी या शैक्षणिक कराराचे महत्व अधोरेखित होणार आहे.

इलिनॉइस विद्यापीठासोबत झालेल्या या शैक्षणिक सामंजस्य करारान्वये दुहेरी पदवी, सह पदवी आर्टिक्युलेट पदवी प्रोग्राम, विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन ज्यामध्ये ऑटोमेटेड सिंथेसाईझर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्राचा समावेश आहे. तर २०५ वर्षे जुने असलेल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत झालेल्या करारान्वये, अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षणासह विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान, सह-दुहेरी पदवी, श्रेणी हस्तांतरण, ऑनलाईन इंटर्नशिप, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रावर दोन्ही विद्यापीठे कार्य करणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठातून मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी मुंबई विद्यापीठाचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या.

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. वैश्विक ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे विविध देशांतील शिक्षण प्रणालींमध्ये विकसित होत असलेल्या परस्परसंवादाद्वारे विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन पद्धतींच्या सामायिकरणास प्रोत्साहन मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि संशोधकांच्या देवाणघेवाणीमुळे एक वेगळा जागतिक नागरिक विकसित करण्यात मदत होईल.”

-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ