गोंदिया, दि.28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांचे वतीने नेत्रदान पंधरवाडा निमित्त जनजागृती आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व डॉ एन.जी. राऊत, प्राध्यापक नेत्र यांचे मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
सदर रॅली गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा चौक, जयस्तंभ चौक मार्गे होऊन नेत्रविभाग कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यामध्ये डॉ.धुवाधपारे, सहा. प्राध्यापक नेत्र व नेत्र विभागातील सर्व निवासी डॉक्टर व कार्यालयीन वर्ग उपस्थित होता. तसेच जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.कन्न्मवार, डॉ.पोयाम वैद्यकीय अधिक्षक बी.जी. डब्लु. व डॉ. सुतार तसेच समाजसेवी श्री. लालवाणी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले व रुग्णालयीन समाजसेवक यांनी सहकार्य केले. रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे एमबीबीएसचे १५० विद्यार्थी तसेच नर्सिंगचे १६० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये नेत्रदानाचे महत्व, माहिती व नेत्रदान प्रक्रिया जनतेला देण्यात आली.
नेत्रदान-दृष्टीदान : जगभरात १२७ लक्ष डोळयाच्या बाहृयपटलाच्या आजारामुळे होणारे (कार्निअल ब्लाईंडनेस)चे रुग्ण आहेत. त्यांना नेत्रदानाव्दारे दृष्टी येऊ शकते. त्यापैकी भारतात ११ लक्ष कार्निअल ब्लाईंडनेसचे रुग्ण आहेत. मात्र नेत्रदान प्रतिवर्षी सुमारे २८ हजार केले जातात. या फरकामुळे बरेचसे रुग्ण अंधत्व निवारणाचा लाभ घेऊ शकत नाही. याबाबतीत जनजागृतीकरिता २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात येतो. डोळयाला मार लागणे, कार्निअल इन्फेक्शन, बुबुळाचे जंतुसंसर्ग, जीवनसत्व-अ ची कमतरता ही कार्निअल ब्लाईंडनेसची प्रमुख कारणे आहेत. यातील बरेच आजारांमध्ये वेळेवर नेत्रतज्ञाव्दारे उपचार घेतल्यास कार्निअल ब्लाईंडनेस टाळता येतो. मात्र उपचाराअभावी / उपचारानंतरही नेत्रबुबुळावर टिक पडल्यास नेत्रदानाव्दारे बुबुळ प्रत्यारोपण (केरोटोप्लास्टी) हा एकमेव उपचार आहे.
कार्निअल ब्लाईंडनेसमुळे येणारे अंधत्व भारतात खुप मोठया प्रमाणात असुन नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी अधिकाधिक नेत्रदानाची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नेत्रदानाचा संकल्प करावा व नेत्रदान प्रतिज्ञापत्र भरुन दयावे. नेत्रदानाविषयी सामान्य जनतेस उपयोगी माहीती खालीलप्रमाणे आहे.
नेत्रदान मृत्युनंतरच केल्या जाऊ शकते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकतो. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या आजारांचेही व्यक्ती नेत्रदान करु शकतात. नेत्रदान मृत्युनंतर जास्तीत जास्त ४ ते ६ तासांच्या आत करणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या, रुग्णाच्या मृत्युनंतर जवळच्या व्यक्तीने नेत्रपेढीस संपर्क करावा. संपर्क क्र. ९७६४७७०३२० व्यक्तीच्या/ रुग्णाच्या मृत्युनंतर चिकित्सकाकडून मृत्यू प्रमाणपत्र घ्यावे. मृत व्यक्तीच्या बंद डोळयांवर स्वच्छ ओला कापड ठेवावा, डोक्याखाली उशी ठेवावी व रुममधील पंखा बंद ठेवावा. नेत्रदान प्रक्रिया १५ ते २० मिनिटात पुर्ण होते व त्यामुळे चेहऱ्यावर विदृपता येत नाही. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीचे अंधत्व दूर करता येते.