आश्रम शाळेत राज्यस्तरीय क्षमता चाचणी परीक्षा संपन्न

0
9

गोंदिया,दि.30: आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून त्यानुसार उपचारात्मक व क्षमतेनुसार अध्यापन करता यावे व केंद्र शासनाच्या मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची पुर्तता करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी या विषयाची क्षमता चाचणी 29 ऑगस्ट 2023 रोजी पार पडली.

       आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील 11 शासकीय आश्रम शाळेतील 2145 विद्यार्थी व 23 अनुदानित आश्रम शाळेतील 4078 विद्यार्थी असे एकूण 6223 विद्यार्थ्यांनी क्षमता चाचणी परीक्षा दिली. या परीक्षेकरीता प्रत्येक केंद्रावर प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उपकेंद्र संचालक म्हणून काम केले तर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी केंद्र संचालक म्हणून कार्य केले. सदर सर्व मुख्याध्यापकांना व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे तर सर्व उपकेंद्र संचालकांना प्रत्यक्ष बैठक घेऊन परीक्षेसंबंधी सर्व सूचना देण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी अधिकाऱ्यांची 5 भरारी पथक तयार करण्यात आलेली होती, अशी माहिती प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली.

                                  प्रकल्प अधिकारी यांची प्रतिक्रिया…

आदिवासी विकास आयुक्त यांच्या निर्देशानुसार इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी 29 ऑगस्टला घेण्यात आली. यामधून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता कळून येणार आहे. आम्ही सुध्दा दर पंधरा दिवसांनी विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर पडताळणी करत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके उपचारात्मक व गुणवत्तापूर्ण अध्यापन शिक्षकांना करता येते. या प्रकल्पांतर्गत सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेमध्ये भविष्यवेधी शिक्षण विचार उपक्रम सुरु असल्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली आहे. आता आश्रम शाळेतील विद्यार्थी इतर समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करीत असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.