मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र- युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन

0
4

शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात युके-भारत भागीदारीचे सक्षमीकरण

मुंबई, दि. २० सप्टेंबरः उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश कॉऊन्सील यांच्या सयुंक्त विद्यमाने शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात युके-भारत भागीदारीचे सक्षमीकरण करण्यासाठी मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र- युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फिरोजशाह मेहता सभागृह विद्यानगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकात दादा पाटील, ब्रिटीश कॉऊन्सीलच्या संचालिका एलिसन बॅरेट, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी, डिपार्टमेंट ऑफ बिझनेस ट्रेडच्या अजिता हाथलिया, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारत-युके रोडमॅप २०३० आणि जी-२० नुसार उच्च शिक्षणातील प्राधान्यक्रम अधोरेखित करण्याच्या उद्देश्याने या परिषदेचे आयोजन होत आहे. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पाऊल टाकत भारत- युके  या दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय शिक्षण सहकार्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत दुहेरी पदवी, भागीदारी, संशोधन सहकार्य, वैश्विक आव्हानांवर संयुक्त तोडगा काढणे अशा विविध विषयांवर या परिषेदेत चर्चा केली जाणार आहे. ट्रान्सनॅशनल एज्युकेशनवर विशेष लक्ष केंद्रीत करून दोन्ही देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील भागीदारीच्या विस्तारीकरणावरही या परिषदेत सखोल चर्चा केली जाणार आहे. या परिषदेसाठी युकेमधील विविध उच्च शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत.

या एक दिवसीय परिषदेत ब्रिटीश कॉऊन्सीलचे विविध शैक्षणिक उपक्रम, सामंजस्य करार याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि ब्रिटीश कॉऊन्सीलचे प्रतिनिधी आढावा घेणार आहेत. ‘संयुक्त पदवीची यशोगाथा आणि आव्हाने’ यावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सोशल सायन्स, लिबरल आर्ट अँड मीडिया, हेल्थकेअर अँड मेडिकल सायन्स यावर पहिले सत्र पार पडणार असून, ओपन डिस्टन्स अँड डिजीटल लर्निंग, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंटरडिसीप्लीनरी एरिया यावर दुसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे.