विविध योजनांचा गरजूंना लाभ मिळवून द्या – चिन्मय गोतमारे

0
18

16 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार सेवा महिना

      गोंदिया, दि.20 : सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येत आहे. या सेवा महिन्यात शासनाच्या विविध योजनांचा गरजूंना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून द्यावा. विविध शासकीय संकेतस्थळावर प्रलंबित अर्जाचा मोहीम स्वरूपात निपटारा करावा तसेच आवश्यक त्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले.

        आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल, संबंधित विभागाच्या स्वतःच्या संकेतस्थळावर सेवा महिना कालावधीत प्राप्त अर्जांचा निपटारा करावा. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शिबिरे घेऊन प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत. या माध्यमातून शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

          सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडित असणाऱ्या महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, आदिवासी, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा या विभागांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रलंबित नोंदीचा फेरफार, मालमत्ता हस्तांतरण नोंदणी, नव्याने नळ जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, शिकाऊ चालक परवाना, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड सुविधा, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी, जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, सखी किट वाटप, नॅान क्रिमिलेअर प्रमाणपत्र, महिला बचत गटास परवानगी अशा एकूण 25 सेवांचा समावेश आहे.

          सर्व संबंधित खात्याच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा महिन्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे, तसेच प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

          सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.