घाटंजीतील आश्रमशाळेच्या २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

0
8

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील घोटी येथील आश्रमशाळेत २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाप्रती तीव्र संताप व्‍यक्त केला. विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२ विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.घाटंजी तालुक्यातील घोटी येथे युगनिर्माण विजाभज आश्रम शाळा आहे. आज, सोमवारी दुपारी जेवण केल्यावर २५ विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी होऊन ताप आला व अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केलेत. त्यातील १२ विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जेवण किंवा अतिउन्हामुळे हा त्रास झाला असावा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय ठमके यांनी सांगितले.युगनिर्माण विजाभज आश्रमशाळेचे संस्थाचालक साहेबराव पवार यांनी शाळेत असा कुठलाही प्रकार घडला नाही, जाणीवपूर्वक अफवा पसरवली जात आहे, असे सांगितले. प्रार्थनेच्यावेळी काही मुलींना मासिक पाळीमुळे त्रास झाला, त्यांचे बघून इतर विद्यार्थीही घाबरले, त्यातून हा प्रकार घडला. कोणताही विद्यार्थी रुग्णालयात दाखल नसल्याचे पवार म्हणाले.