गोंदिया दि. १५ :- मागील वर्षभरापासून गोंदिया जिल्हा माध्यमिक शाळांमधून सुरू असलेला ‘माझी शाळा, माझी पंचसूत्री ‘ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी फलदायी ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद, गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
मूलभूत क्षमता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षांना प्रविष्ट विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन,सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देणे तसेच प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छतागृह इ. सुविधांचा लाभ देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वांचा सहभाग घेणे अशा या पंचसूत्रीची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिक्षणाधिकारी माध्यमिक व योजना कार्यालयाचे वतीने गोंदिया जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा पुंजाभाई पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती,त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे ऑनलाईन उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा विचार करून शाळांनी आपला कृती आराखडा तयार करावा.त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन करून गोंदिया जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणेसाठी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डाएटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांनी NMMS परीक्षेसाठी २ वर्षांपूर्वी १६०० विद्यार्थी बसले होते तर यावर्षी ४८०० इतक्या विद्यार्थ्यांना बसविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कमाल शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
NMMS परीक्षेत उत्तम यश मिळविलेल्या शाळांचा सत्कार शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते करण्यात आला.’संवाद गुणवत्तेचा’ या कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील एका मुख्याध्यापकाने शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरण यावेळी केले.
शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विषय पत्रिकेवरील सर्व प्रशासकीय व गुणवत्तासंबंधी विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये गोंदिया जिल्हा गुणवत्तेसाठी राज्यात अग्रस्थानी राहील यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत,असे निर्देश दिले.
कार्यशाळेच्या शेवटी माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला.यावेळी पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निकोसे हेही उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी दिघोरे,विवेक रोकडे,सुरेश रहांगडाले यांनी विशेष प्रयत्न केले.