आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा विज्ञान शैक्षणिक दौरा

0
5

गोंदिया, दि.23 : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात आश्रम शाळेतून वैज्ञानिक निर्माण व्हावे या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सायन्स सिटी अहमदाबाद येथे भेट देऊन पृथ्वीच्या निर्मितीपासून ते भविष्यातील टेक्नॉलॉजी म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा अभ्यास केला तर विक्रम साराभाई अंतरिक्ष प्रदर्शनी सेंटर अहमदाबाद येथे जाऊन भारताने आतापर्यंत सोडलेल्या उपग्रहांचा व या उपग्रहांना घेऊन जाणाऱ्या रॉकेटचा अभ्यास केला. सोबतच पृथ्वीची कक्षा म्हणजे काय गुरुत्वाकर्षण कसे काम करते या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेतली. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान शैक्षणिक सहल अशा रितीने सफल झाली.

          या सहलीत भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वेगवेगळे आंदोलने केली त्या आंदोलनाची रूपरेषा ज्या ठिकाणी ठरवण्यात आली अशा साबरमती आश्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजून घेतला. लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीची वस्तू म्हणजे चॉकलेट अशाच अमूल या कंपनीच्या चॉकलेट प्लांटला भेट देऊन दुधावर प्रक्रियेपासून ते चॉकलेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समजून घेतली या सर्व प्रक्रियेत कुठेही मानवाचा स्पर्श न होता सर्व संगणकाद्वारे नियंत्रित होते हे खूप मोठे आश्चर्य सर्वे विद्यार्थ्यांसाठी होते.

          भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट देऊन विद्यार्थांना भारताच्या आधुनिक वास्तुकलेचा नमुना पाहायला मिळाला व तेथील संग्रहालयातील चित्र व वस्तुवरून त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग समजून घेता आले.

           नेहरू सायन्स सेंटर मुंबई येथे आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या तंत्रज्ञानामागचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेतले व त्याचा अभ्यास केला तर नेहरू प्लॅनेटेरियम मुंबई येथे जाऊन आकाशगंगा व सूर्यमाला म्हणजे काय हे प्रत्यक्ष दृकश्राव्य माध्यमातून समजून घेतले, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाविषयी जिज्ञासा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यात शिकलेल्या बाबींची माहिती दिल्यामुळे सर्व शाळेतील वातावरण सध्या विज्ञानमय झाल्याचे दिसून येत आहे. या विज्ञान शैक्षणिक अभ्यास दौऱ्याहून परत आलेले विद्यार्थी अत्यंत आनंदी असून या दौऱ्यात आलेले अनुभव चिरकाल टिकणारे आहेत असे सांगत आहेत. सोबतच प्रकल्प अधिकारी यांनी हा दौरा आयोजित केल्यामुळे त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.

       विद्यार्थी प्रतिक्रिया :- या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात आम्ही नागपूर ते अहमदाबाद असा विमान प्रवास केला. आम्ही आतापर्यंत फक्त आकाशात उडणारे आणि टीव्ही वरील विमान पाहिले होते, आज प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थांना खूप आनंद झाला. आम्ही अहमदाबाद येथे सायन्स सिटी, इस्रो सेंटर, साबरमती आश्रम तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भेट देऊन तेथील बाबींचा अभ्यास केला तर मुंबई येथे ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, जुहू बीच येथे छान मजा केली तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नेहरू प्लॅनेटेरियम व नेहरू सायन्स सेंटर येथे भेट देऊन तेथील बाबी समजून घेतल्या.                             – जयंत निरमल मडकामविद्यार्थी

      प्रकल्प अधिकारी प्रतिक्रिया :- आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी JEE व NEET परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळविले. आता आम्हाला आश्रम शाळेतून भविष्यात वैज्ञानिक घडवायचे आहेत, त्यामुळे विज्ञानावर आधारित हा संपूर्ण दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याची जबाबदारी संजय बोंतावार, दिपेश मांडे व एकता भलावी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडली व विद्यार्थांना जास्तीत जास्त ज्ञान मिळवून दिले.                                                                                                            – विकास राचेलवारप्रकल्प अधिकारी