‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

0
11

मुंबई, दि. 03: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जवाहर बालभवन येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.

या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभदेखील 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमात राजभवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत. तर उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनजंय मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अ व ब वर्गाच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. या अभियानातून 2 कोटी मुलांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, दत्तक शाळा योजनेत मोठमोठे उद्योग समूह सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व)  निधीच्या उपयोगातून शाळांमध्ये पायाभूत सोयी – सुविधा अद्ययावत करून देणार आहेत. या योजनेतून कुठल्याही प्रकारे शाळांचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. केवळ शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत करण्याचा यामागील उद्देश आहे. महावाचन उत्सव – महाराष्ट्रातील वाचन चळवळ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनातून प्रगल्भ करण्याचा उद्देश आहे. उच्च शिक्षण विभागाच्या राज्यात असलेल्या विविध ग्रंथालयांना या उत्सवासाठी शाळांसोबत संलग्न करण्यात येणार आहे. वाचन उत्सवातून विद्यार्थ्यांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे.

माझी शाळा – माझी परसबाग उपक्रमाविषयी माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, या उपक्रमातून शाळांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे. शाळांमध्ये परसबाग असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शेतीबद्दलचे ज्ञान वाढेल, त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, शेतीबद्दलचे आकर्षण वाढेल. परसबागेत भाजीपाला उत्पादनासाठी कृषी विभागामार्फत बिया पुरविण्यात येतील. परसबागेत उत्पादित भाजीपाल्याचा समावेश ‘पोषण आहार’ मध्ये करण्यात येईल. यात आठवड्यातून एक दिवस अंडी, भात किंवा भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थाचा समोवश करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजत आहे. स्वच्छतेसाठी विद्यार्थी आग्रही होत आहेत. हा सकारात्मक बदल दिसून येत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ 5 डिसेंबर रोजी होत आहे. या उपक्रमांमध्ये शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.