वैज्ञानिक जाणिवा समृद्धीसाठी विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता: पंकज रहांगडाले

0
8

गोंदिया,दि.03-विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक,पालक यांच्यामध्ये वैज्ञानिक जाणिवा समृद्ध व्हाव्यात यासाठी विज्ञान प्रदर्शनाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.श्री राजस्थान कन्या विद्यालय, गोंदिया येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांसह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळाही सहभागी होत असल्याने संपूर्ण जिल्हाभरातून उत्तम साहित्य याठिकाणी येत असल्याने सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या मानवी जीवनातील प्रगती ही विज्ञानाची देणगी आहे, त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन सर्व शाळांमधून विज्ञान विषय प्रात्यक्षिकांद्वारेच शिकविला जाणे आवश्यक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.विज्ञान विषयाने घेतलेली भरारी, वैज्ञानिक विश्वातील सद्यस्थिती, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य,तंत्रज्ञान, आरोग्य व संस्कारांची खूप गरज असल्याचे विचार त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,उपाध्यक्ष यशवंत गणवीर, समाज कल्याण सभापती पूजा सेठ यांचीही यथोचित भाषणे झाली.
यावेळी वैज्ञानिक प्रयोगाने उद्घाटन झाले.माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रास्ताविक केले तर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी पंचायत समिती,गोंदियाचे सभापती  मुनेश रहांगडाले,जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत, शैलेश नंदेश्वर,सौ.नेहा तुरकर,सौ.छबूताई उके,सौ.वंदना काळे,विमल कटरे, मारवाडी युवक मंडळ संस्थेचे पदाधिकारी, उपशिक्षणाधिकारी लांडे, दिघोरे, गोंदिया गटशिक्षणाधिकारी राऊत,तिरोडा गटशिक्षणाधिकारी चौधरी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक श्रीमती पुरोहित इ.उपस्थित होते.तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.