१९ फेब्रुवारीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार..

0
12

गोंदिया,दि.03- अनेक वर्षांपासून मराठा समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या प्रतीक्षेत होता. पुतळ्यासाठी शहरातील मनोहर चौकात असलेली ५७२ चौरस फूट शासकीय जागा निवडण्यात आली होती.गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये समाज आणि इतर सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा १३ फूट उंच अश्वारूढ़ पुतळा गोंदियात आणत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. परंतु प्रशासकीय स्तरावर पुतळा बसविण्याची परवानगी नसल्याने पुतळा बसवता आला नव्हता.मात्र माजी पालकमंंत्री डाॅ.परिणय फुके यांनी पुढाकार घेत 2 फेबुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत समाधानकारक तोडगा काढला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे हा धार्मिक हेतू नाही. हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे पुतळा बसवावा. याबाबत प्रशासकीय पातळीवर सहमती व्यक्त करत मराठा समाजाला पुतळा बसविण्यास परवानगी देण्यात आली.लवकरच शासकीय पातळीवर मराठा समाज समितीच्या देखरेखीखाली पुतळा शासकीय ठिकाणी बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेली जागा राज्य सरकार समाजाला समर्पित करेल, असा मला विश्वास आहे.

यावेळी मराठा समाजाने माजी पालकमंत्र्यांचे आभार मानले. १९ फेब्रुवारीला या पुतळ्याची भव्य स्वरुपात प्रतिष्ठापना होणार असून, सोहळ्याचा जल्लोष संपूर्ण गोंदिया पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, तहसीलदार समशेर पठाण, पीआय चंद्रकांत सूर्यवंशी, मराठा समाजाचे माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, दीपक कदम, संतोष जाधव, राजेंद्र जगताप, सीमाताई बढ़े , अमृत इंगळे , आलोक पवार , भावनाताई कदम , दत्ता सावंत , प्रतीक कदम , अमित झा , श्री काळे, रमेश दलदले, बाळाराम व्यास यांच्यासह अनेक मराठा समाज व इतर समाज बांधव उपस्थित होते.