डॉ. प्रवीण वाळके यांना फ्रान्सच्या केन विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण

0
3

जगभरातील ६ प्राध्यापकांमध्ये निवड

मुंबई, दि. ०७ मेः मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोविज्ञान आणि नॅनोतंत्रज्ञान केंद्रात पदार्थ विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणारे डॉ. प्रवीण वाळके यांना फ्रान्सच्या नॉर्मंडी येथील प्रतिष्ठित केन विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. फ्रान्सच्या केन विद्यापीठामार्फत दरवर्षी जगभरातील ५ ते ६ प्राध्यापकांची अभ्यागत प्राध्यापक म्हणून निवड केली जाते. डॉ. प्रवीण वाळके हे फ्रान्स शासनाच्या केंद्रीय ज्ञान शोध संस्थेचे संचालक व जगप्रसिद्ध संशोधक आणि वैज्ञानिक डॉ. विल्फ्रिड प्रेलियर, सीएनआरएस यांच्यासोबत संशोधनाचे कार्य करणार आहेत. सीएनआरएस नियमनामतील क्रिसमॅट प्रयोगशाळा ही तेथील अद्ययावत उपकरणे आणि प्रगत संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. येथील संशोधनाचा मुंबई विद्यापीठ आणि आंतराष्ट्रीय सहयोगासाठी विशेष लाभ होणार आहे. डॉ. वाळके यांनी यापूर्वी या संस्थेत यूरोपमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेरी क्युरी शिष्यवृत्ती अंतर्गत येथे संशोधनाचे कार्य केले आहे.

डॉ. प्रवीण वाळके व त्यांची चमू सध्या नॅनोमटेरिअल्सचा वापर करून अद्ययावत बॅटरीवर संशोधन करीत आहेत. ज्यामध्ये जलद-चार्जिंग, हलके-वजन, किफायतशीर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरी तंत्रज्ञानासाठी नॅनोस्ट्रक्चर्ड मटेरियलच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य त्यांच्या चमूने हाती घेतले आहे. डॉ. प्रवीण वाळके यांनी अनेक शोधनिबंध उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. तसेच अनेक पेटंट आणि शोध प्रकल्प त्यांचे पूर्ण झाले असून, नवीन प्रकल्पांवर कार्य चालू आहे. नुकतेचं त्यांना महाराष्ट्र विज्ञान अकॅडेमीचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. अभ्यागत प्राध्यापक कार्यकाळात ते विविध पदार्थाचे थीन फिल्म ( thin film) व त्याच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास करणार असून याचा थीन (thin) बॅटरी आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासाठी विशेष उपयोग होणार आहे. हे तंत्रज्ञान पुढील काळात इंडस्ट्री ४.० आणि ५.० यांस पूरक असणार आहे. त्यामुळे सध्या चर्चेत असेलेले नॅनोमिशन आणि क्वांटम मिशन यास पूरक संशोधन होणार आहे. त्यांच्या या संशोधनाच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी व सहयोगी संशोधकांना अनेक संशोधनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी डॉ. प्रवीण वाळके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.