दहावीचा निकाल नागपूर विभागात गोंदिया अव्वल ; जिल्ह्याचा निकाल ९६.११ टक्के

0
77

जिल्ह्यात रिया गेडाम प्रथम,उर्वशी दिघोरे व्दितीय व मौसमी जैतवार तृतीय

गोंदिया, ता. २७ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी (ता. २७) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल असून, निकालाची एकूण टक्केवारी ९६.११ इतकी आहे. उल्लेखनीय म्हणजे, बारावी पाठोपाठ दहावीतही मुलीच समोर आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.८८ इतकी आहे, मुलांच्या निकालाची टक्केवारी ९४.५० इतकी आहे.  गोंदिया जिल्ह्यातून विवेक मंदिर इंग्लिश स्कूल ची विद्यार्थींनी कु. रिया रोशन गेडाम हिने 98.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर  चंचलबेन एम. पटेल इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी कु. उर्वशी सुनील दिघोरे हिने 98.40 टक्के गुण मिळवित दूसरा क्रमांक तसेच याच स्कूलची कु. मौसमी मुनेश्वर जैतवार हिने 98.20 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
इयत्ता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाची उत्कंठा आणि प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही होती. अखेर शिक्षण मंडळाने सोमवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करत त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. गतवर्षीची परंपरा कायम राखत मुली यंदाही टक्केवारीत समोर आहेत. जिल्ह्याचा निकाल ९६.११ टक्के इतका लागला. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९४.५० इतकी असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.८८ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यातून प्रावीण्य श्रेणीत ६३७३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ६९७६, द्वितीय श्रेणीत ३४७४, तर उत्तीर्ण श्रेणीत ६३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९४९२ मुले, तर ८६६८ मुली अशा १८ हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ८९७० मुले व ८४८५ मुली असे १७ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात सर्वाधिक ९७.९४ टक्के निकाल सडक अर्जुनी तालुक्याचा आहे. सर्वात कमी ९४.६८ टक्के निकाल देवरी तालुक्याचा आहे.

तालुकानिहाय निकाल… (टक्केवारीत)
गोंदिया ः ९६.६४, आमगाव ः ९५.२५, अर्जुनी मोरगाव ः ९६.३४, देवरी ः ९४.६८, गोरेगाव ः ९५.४३, सडक अर्जुनी ः ९७.९४, सालेकसा ः ९५.९४, तिरोडा ः ९५.४७

विवेक मंदिरच्या रिया गेडामला ९८.६० टक्के
गोंदिया ः येथील विवेक मंदिर शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी रिया रोशन गेडाम हिने ९८.६० टक्के गुण मिळविले आहे.‌ शाळेतून तिने प्रथम क्रमांक मिळविला असून, तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

जानकीदेवी चौरागडे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
गोंदिया ः कुडवा येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रतिक ढेकवार याने ९२.६० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राजीव राकेश वारजुरकर याने ९१.६० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक, तर आर्यन हरिश शहारे, अमिषा झनकलाल ठाकरे, तृप्ती मुलचंद न्यायकरे यांनी संयुक्तपणे ८९.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. एकूण ४१ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव सुरेश चौरागडे व संचालिका रेखादेवी चौरागडे, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले.

विद्या निकेतनची अदिती भदोरिया तालुक्यात प्रथम

आमगाव ः येथील विद्या निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अदिती भदोरिया हिने दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अदितीने आपल्या यशाचे श्रेय पालक आणि शिक्षकांना दिले आहे.विद्या निकेतन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, कोषाध्यक्ष नरेश माहेश्वरी आणि संघटन सचिव रघुवीरसिंग सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक पी. बी. भक्तवर्ती व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.