परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठास पसंती

0
29

जपान, पॅलेस्टाईन, फिजी, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, मॉरिशस, लिसोथासह अनेक देशातील विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

मुंबई, दि. १8 ऑगस्टः मुंबई विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांस परदेशी विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दर्शवली आहे. मानसशास्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य, समाजशास्त्र, कम्पुटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारीता आणि भाषाशास्त्र अशा विषयांना या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये जपान, पॅलेस्टाईन, फिजी, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, मॉरिशस, युगांडा, लिसोथासह १४ देशातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील सर्व विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पदवी अभ्यासक्रमांसाठीही परदेशी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बीएस्सी (कम्पुटर सायन्स), बी.ए.एमएमसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी हे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून पहिल्यांदाच सर्वाधिक परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विद्यापीठात झाले आहेत. आयसीसीआरच्या विविध योजनाअंतर्गत पूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्तीवर हे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

आयसीसीआरच्या व्यतिरिक्त अनिवासी भारतीय, भारतीय वंशाची व्यक्ती आणि भारताचे परदेशी नागरिकत्व या वर्गवारीतूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातील बहुतांश ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयात पदवीच्या पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली आहे.

मुंबई विद्यापीठाने मागील वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत विविध पदव्युत्तर आणि पदवीच्या अभ्यासक्रमांची पूनर्रचना केली आहे. बहुविद्याशाखीय,लवचिकता, कार्यांतर्गत प्रशिक्षण, सह पदवी, दुहेरी पदवी, संशोधन, कौशल्यवृद्धी,भारतीय ज्ञान प्रणाली, क्षमता संवर्धन आणि वैकल्पिक विषय असे विद्यार्थी केंद्रीत मोठे बदल करून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पाऊल टाकत वैश्विक ज्ञानार्जनाच्या कक्षा रुंदावल्या असल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठास पसंती मिळणे हे समाधानकारक असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह राहायला उपलब्ध झाल्यामुळे नजीकच्या काळात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल असेही त्यांनी सांगितले.