मुंबई विद्यापीठातर्फे ई-समर्थ कार्यप्रणालीबाबत महाविद्यालयांना प्रशिक्षण

0
19

सातही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसाठी २० ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यशाळांचे आयोजन

मुंबई, दि. २२ ऑगस्टः मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाच्या ई-समर्थ प्रणालीचा अवलंब केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे प्रवेश, नाव नोंदणी, पात्रता व प्रमाणपत्रांची कार्यवाही करण्यात येते. महाविद्यालयांमार्फत ई-समर्थ पोर्टलवर करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यात २० ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कार्यशाळेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे २० ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ३५ महाविद्यालये सहभागी झाली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाअंतर्गत २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी २० महाविद्यालये सहभागी झाली होती. तर २२ ऑगस्ट रोजी रत्नागिरी उप परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत २४ महाविद्यालये सहभागी झाली होती.

सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक आणि महाविद्यालयीन प्रतिनिधींना प्रवेश नाव नोंदणी, पात्रता, आणि स्थलांतर प्रमाणपत्र बाबतची आज्ञावली, विद्यार्थ्यांचे जाहीर करावयाचे निकाल, संलग्नता विभागाच्या अनुषंगाने पोर्टलवर भरावयाची माहिती आणि त्याबाबतचे प्रात्यक्षिक याची माहिती देण्यात आली. विद्यापीठाच्या वतीने डीआयसीटी संचालक डॉ. प्रवीण सिनकर, डॉ. हिरेन दंड, संलग्नता विभागाचे उपकुलसचिव दिपक वसावे, प्रवेश, नावनोंदणी, पात्रता आणि स्थलांतर विभागाचे उपकुलसचिव अशोक घुले आणि परीक्षा विभागाच्या वतीने उपकुलसचिव नरेंद्र खलाने यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेतील पुढील टप्प्याअंतर्गत २४ ऑगस्टला सिंधुदुर्ग, २८ ऑगस्टला पालघर, २९ ऑगस्टला ठाणे, ३० ऑगस्टला नवी मुंबई व पनवेल आणि ३१ ऑगस्टला मुंबई विद्यापीठात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.