मुंबई, दि. २६ ऑगस्टः वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद कारंडे यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार स्विकारला. व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मावळते प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी डॉ. प्रसाद कारंडे यांना कुलसचिव पदाचा कार्यभार सोपवला. दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. प्रसाद कारंडे यांची निवड समितीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड करण्यात आली होती.
डॉ. प्रसाद कारंडे हे वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बीई (मॅकेनिकल) आणि एमई (प्रोडक्शन) शाखेत पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकी शाखेत पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. डॉ. प्रसाद कारंडे यांना एकूण २८ वर्षांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाचा यशस्वीरित्या प्रभारी कार्यभार सांभाळला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी डॉ. प्रसाद कारंडे यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यकालिन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशाशकीय कामकाजात गतिमानता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी डिजिटायझेशन वर भर देऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ. प्रसाद कारंडे यांनी पदभार स्वीकारतेवेळी सांगितले.